मेहकर, लोणारांतील रेकॉर्ड ब्रेक सभांतून तुपकरांचा जाधवांवर तुफान हल्ला; प्रतापरावांनी जिल्ह्याचं वाटोळं केलं!
बुलढाणा/मेहकर/बिबी (प्रशांत खंडारे/ऋषी दंदाले) – लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच पेटले असून, शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार तथा मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर त्यांच्याच बालेकिल्ल्यात रेकॉर्डब्रेक सभा घेऊन तुफान हल्ला चढविला. पाच वर्षातून केवळ निवडणुकीच्या काळात दिसून येणारे दुर्मिळ खा.जाधव पुन्हा एकदा आपल्या धनशक्तीच्या जोरावर मत मागत आहेत. गेल्या पंधरा वर्षात त्यांनी जिल्हा भकास करून ठेवला. या पंधरा वर्षात त्यांनी मातृतीर्थ जिल्ह्याचं वाटोळ केलं आहे, त्यामुळे आता खा.जाधवांना घरी बसवा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जनसामान्यांचा पाना विजयी करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. काल १३ एप्रिल रोजी लोणार येथे तुपकरांची उत्स्फूर्त प्रचार रॅली निघाली तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर व मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव, बेलगाव या चार सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहावयास मिळाली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जिल्हाभरात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. काल (ता.१३ एप्रिल) लोणार आणि मेहकर तालुक्यात सर्वत्र रविकांत तुपकरांचा ‘पाना’ गाजला. सकाळी ११ वाजता लोणार शहरात उत्स्फूर्त रॅली निघाली. त्यांनतर दुपारी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे उन्हा-तान्हात जोरदार सभा झाली, तर मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव व बेलगाव येथील सभांना नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. यावेळी रविकांत तुपकर यांनी खासदार जाधव यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की मी सर्वसामान्य जनतेने उभा केलेला स्वतंत्र उमेदवार असून, विजयी झाल्यावरही स्वतंत्रच राहील. सिंदखेडराजा, शेगाव, संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ मेहुणाराजा, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक सैलानी बाबा दर्गा यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा कायापालट होणे गरजेचे आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यात विकास नव्हे तर जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत जिल्हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. परंतु विद्यमान खासदारांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. मंदिर व देवस्थानाच्या जमिनी हडपणे, दादागिरी करणे, कमिशनबाजी, ठेकेदारी, गिट्टी मुरूम आणि समृद्धीतून मिळवलेली समृद्धी हे सर्व जनतेला माहिती आहे. जनता स्वतः यांना घरी बसवण्यासाठी एकजूट झाली आहे. मी बनावट भूमिपुत्र नसून खराखुरा शेतकरी पुत्र आहे. मी गेल्या २२ वर्षात शेतकरी, कष्टकरी, तरुण, सर्वसामान्य जनतेसाठी लढा दिला आहे. हजारो आंदोलने केली, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांचा मार सहन केला, तडिपारी भोगली तुरुंगात गेलो हे सर्व सामान्य जनतेसाठी केले. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, अतिक्रमणधारक, आदिवासी, बारा बलुतेदार व शहरी नागरिक अशा सर्वच घटकांसाठी मी काम करत आलो आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील आणि शहरी व ग्रामीण भागातील जनता माझ्यासोबत आहे. हा लढा आता ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ असा झाला आहे. गेल्या २२ वर्षात मी जे काम केलं त्या कामाची मजुरी म्हणून एक मत मागत आहे. ‘एक वोट आणि एक नोट’ या आवाहनाला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आता आपलाच विजय होणार आहे. प्रत्येक जण स्वतःला रविकांत तुपकर समजून घेणे कामाला लागा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
‘जनतेचा कणखर बाणा, निवडून आणा पाना’ या घोषणेने प्रचाराचा कालचा दिवस दणाणून सोडला. घरची चटणी-भाकर खाऊन लोक प्रचाराला भिडले आहेत. सर्वत्र रविकांत तुपकरांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे. ‘तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा विश्वास नागरिक व्यक्त करताना दिसत होते.
शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत जिल्हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. परंतु विद्यमान खासदारांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. मंदिर व देवस्थानाच्या जमिनी हडपणे, दादागिरी करणे, कमिशनबाजी, ठेकेदारी, गिट्टी मुरूम आणि ‘समृद्धी’तून मिळवलेली समृद्धी हे सर्व जनतेला माहिती आहे. जनता स्वतः यांना घरी बसवण्यासाठी एकजूट झाली आहे. मी बनावट भूमिपुत्र नसून खराखुरा शेतकरी पुत्र आहे.
– रविकांत तुपकर, अपक्ष उमेदवार, बुलढाणा लोकसभा
——–