NAGARPachhim MaharashtraPolitics

ओबीसी आरक्षणाच्या संवर्धनासाठी लोकसभेच्या मैदानात; शेतकरी, ऊसतोड मजूर, कामगारांच्या प्रश्नांवर लढणार!

– भगवानगडावर जाऊन घेतले संत भगवानबाबांचे दर्शन; खरवंडी कासारमध्ये जोरदार रॅली!

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – ओबीसी समाजाचे आरक्षण कायम जीवंत ठेवून समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी केले. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी आघाडीची उमेदवारी जाहीर झालेले ओबीसीनेते तथा माजी प्रशासकीय अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेवून खरवंडी कासार येथून जिल्ह्यात मतदाराच्या संवाद यात्रेस आजपासून प्रारंभ केला. यानिमित्त ते बोलत होते.

मतदारांशी संवाद साधताना खेडकर म्हणाले की, आज ओबीसी आरक्षण घोक्यात आहे. कोणताच राजकीय पक्ष या गंभीर प्रश्नात लक्ष घालत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी तसेच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी हा लढा हाती घेतला आहे. ओबीसी समाज हा मागासलेला आहे, त्याच्या हितासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही, मी ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे सामन्य जनतेच्या प्रश्नाची मला जाण आहे व अनुभवले आहेत. आज शिक्षण, आरोग्य, शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. आज समोर दोन बलाढ्य शक्ति निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. त्यांना सामन्य जनतेचे देणेघेणे नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह आदीना आज ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न होत आहे. हक्कासाठी हा लढा हाती घेतला आहे, त्यासाठी सर्वांची साथ अत्यंत महत्वाची आहे असल्याचे श्री खेडकर यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ.मनोरमा खेडकर, आदिनाथ दहिफळे, तींनखडीचे सरपंच बाळासाहेब खेडकर, कृष्णा पांचाळ, किशोर आव्हाड, माणिक खेडकर, यांच्यासह कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी खरवंडी कासार ते भगवानगड अशी वाजत गाजत भव्य फेरी काढत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.


ओबीसींच्या आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न होत असताना, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन्हीही उमेदवार सुजय विखे (भाजप) व नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार) यांनी आवाज उठविला नाही. शेती, शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विखे यांनी मागील पाच वर्षात काहीही काम केले नाही. त्यामुळे या मतदारसंघात या दोन्हीही नेत्यांविषयी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेला वंजारीसह इतर ओबीसी समाज हा दिलीपराव खेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याने, त्यांच्या उमेदवारीचा फटका कुणाला बसतो, हे पाहणे औत्सुक्याचे झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!