डोक्यात फरशी घालून पळून गेले; चिखली पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पकडले!
– चिखलीतील आठवडीबाजारात झाला होता खुनाचा निर्घृण प्रयत्न, पीडित अद्यापही अत्यवस्थ
चिखली (महेंद्र हिवाळे) – खून करून पळून जाणारा आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद करण्याची धडाकेबाज कारवाई जगातील नंबर एकची पोलिस समजली जाणारी स्कॉटलंड पोलिस करत असते. परंतु, चिखलीच्या पोलिसांनी या पोलिसांचीही कामगिरी मोडित काढून, डोक्यात फरशी घालून पळून गेलेल्या दोन आरोपींना मोठ्या शिताफीने व चातुर्याने अवघ्या पाच तासांच्याआत गजाआड केले. पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक होत आहे. चिखलीतील आठवडीबाजारात काल (दि.९) खुनाचा हा निर्घृण प्रयत्न झाला होता. यातील पीडित हा अद्यापही अत्यवस्थ असून, मृत्युशी झुंज देत आहे.
सविस्तर असे, की काल पोलिसांना माहिती मिळाली की, गजानन टी सेंटरसमोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ सहकार्यांसह आठवडी बाजारात धाव घेतली व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला तातडीने ग्रामीण रुग्णालय चिखली येथे नेऊन उपचारासाठी भरती केले. त्यानंतर या व्यक्तीचे नाव निष्पन्न केले असता तो चिखली शहरातील राजू नंदू डोळफोडे (वय ४० वर्ष रा. इंदिरानगर) असे असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना या घटनेची माहिती देऊन फिर्यादी गं.भा.लक्ष्मी राजू वाघ रा. इंदिरा नगर, चिखली यांना विचारपूस करून तक्रार नोंदवून घेतली. लक्ष्मी वाघ यांनी सांगितले की, त्यांचा नंदई जखमी राजू नंदू डोळफोडे यास आठवडी बाजारात गजानन टी सेंटरसमोर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. या फिर्यादीच्या रिपोर्टवरुन गु. र. नं. २७९/२०२४ कलम ३०७ भादविंप्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.
पीडित जखमी हा बेशुद्ध असल्याने व त्यास पुढील उपचाराकामी बुलढाणा व तेथून अकोला, नागपूर असे रेफर केल्याने नमूद घटना कोणी व कोणत्या कारणासाठी केली याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ठाणेदार संग्राम पाटील यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी व आरोपी शोधकामी एपीआय संजय मातोंडकर, शरद भागवतकर, नितीनसिंह चव्हाण, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, चंद्रशेखर मुरडकर, राहुल पायघन, नीलेश सावळे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, पंढरी मिसाळ, राजेश मापारी, सुनील राजपूत यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने सूचना देऊन रवाना केले.
या पथकांनी गोपनीय माहिती तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे जखमी राजू डोळफोडे यास आरोपी नामे विनोद रामचंद्र लाखाडे व सचिन आत्माराम राठोड दोन्ही रा. लोणार यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे निष्पन्न केले व तात्काळ लोणार येथे रवाना होऊन नमूद आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना लोणार येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपींची सखोल व बारकाईने विचारपूस केली असता, त्यांनी जखमीस जीवे मारण्याच्या दृष्टीने डोक्यात फरशी मारून खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली असून, नमूद आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरु होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात एपीआय संजय मातोंडकर, पीएसआय शरद भागवतकर, पीएसआय नितीनसिंह चव्हाण, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, चंद्रशेखर मुरडकर, राहुल पायघन, नीलेश सावळे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, पंढरी मिसाळ, राजेश मापारी, सुनील राजपूत यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, हा गुन्हा उघड करण्यासाठी चिखली शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची मोठी मदत झाली असून, शहरातील नागरिकांनी व व्यापार्यांनी आपल्या प्रतिष्ठान व घरी कॅमेरे लावण्याचे आवाहन ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले आहे.