रविकांत तुपकर, राजू शेट्टी हे शेतकरी नेते यंदा संसदेत गेले नाहीत, तर शेतकर्यांसाठी जीवाची बाजी लावणार कोण?
– शेतकर्यांना लढण्यासाठी हे नेते हवे असतात, मतदान करताना मात्र जात पाहिली जाते!
– राजकीय पक्षांकडून दोन्ही नेत्यांची कोंडी, संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी व्यूहरचना
मुंबई (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर हे शेती-मातीच्या प्रश्नांवर सत्ताधारीवर्गाशी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी छाताडावर पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलल्यात, वेळप्रसंगी जेलमध्ये गेले. त्यामुळे शेतकर्यांना पीक नुकसान भरपाई, ऊस, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांच्या भावात वाढ होऊ शकली. परंतु, आता जेव्हा या नेत्यांना शेतकर्यांच्याच प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी संसदेत पाठविण्याची वेळ आली आहे, तेव्हा हेच शेतकरी या दोन्ही नेत्यांना मतदान करतील का? हा प्रश्न आहे. कारण, मतदानाची वेळ आली की हाच शेतकरी जातपात, धर्म आणि नानाविध भुलभुलैय्यांना भुलून मतदान करतात, तेथे त्यांना या शेतकरीनेत्यांच्या उपकाराची विसर पडते, असे दुर्देवाने दिसून आलेले आहे. ही चूक सुधारण्याची संधी यावेळेस आली आहे. या लोकसभा निवडणुकीत हे शेतकरी नेते लोकसभेत गेले नाहीतर मात्र शेतकरी चळवळच संपुष्टात येण्याची भीती आहे. ज्यांच्यासाठी संघर्ष करायचा, तेच साथ देणार नसतील तर मग शेतकर्यांसाठी लढायला पुढे कुणी येणार नाही. म्हणून, तुपकरांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना, गेल्या २२ वर्षातील शेतकर्यांसाठीच्या संघर्षाची ‘मजुरी’ म्हणून ‘एक मत’ मागितले आहे. या नेत्यांच्या विजयासाठी शेतकरी चळवळीतील युवा मने सद्या कमालीची अस्वस्थ आहेत.
शेतकरी नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर हे यंदा लोकसभेच्या मैदानात आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांची कोंडी केलेली आहे. धनदांडग्या उमेदवारांसमोर या नेत्यांचा निभाव लागणे कठीण आहे. परंतु, जेव्हा शेतकरी अडचणीत असतो, शेतमालाला भाव मिळत नाही, तेव्हा हेच दोन नेते सत्ताधारीवर्गाविरोधात दंड थोपाटतात. रविकांत तुपकरांनी शेतकर्यांसाठी आजपर्यंत जी आंदोलने केलीत ती अक्षरशः जीवावर बेतणारी होती. आणि, या प्रत्येक आंदोलनातून तुपकरांनी काहीना काही यश मिळवत ते शेतकर्यांच्या पदरात टाकलेले आहे. त्याची प्रचिती म्हणजे अगदी पेरणी व दिवाळीच्या काळात शेतकर्यांच्या खात्यात पीकविमा व नुकसानभरपाईची जमा झालेली रक्कम, ही होय. कापूस, सोयाबीन, कांदाप्रश्नी तुपकरांनी आंदोलने केलीत म्हणून या पिकांना बर्यापैकी भाव मिळू शकला.
तिकडे पश्चिम महाराष्ट्रातही राजू शेट्टी यांच्या धडाकेबाज आंदोलनामुळेच कांदा, ऊस या पिकांसह दुधाला चांगला भाव मिळू शकला. एकीकडे, शेतकर्यांना या दोन नेत्यांमुळे मोठा आर्थिक फायदा झाला. जेव्हा शेतकरी संकटात सापडतो तेव्हा हेच दोन नेते त्यांच्या मदतीला धावून जातात. परंतु, आता जेव्हा तुपकर असो, की शेट्टी यांच्या पदरात मताचे दान टाकण्याची वेळ आली आहे, तेव्हा हाच शेतकरी जातीपातीला महत्व देताना, राजकीय पक्षाच्या ‘भाऊ-दादा’ला महत्व देताना दिसत आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या भुलभुलैय्या भाषणांना आणि खोट्या आश्वासनांना बळी पडताना दिसत आहे. परंतु, ‘अभी नही तो कभी नही’ अशी सुवर्णसंधी यावेळी निर्माण झालेली आहे. अशावेळी या शेतकरी नेत्यांना संधी न मिळाल्यास रविकांत तुपकर किंवा राजू शेट्टी यांचेच नव्हे, तर एका पिढीचे आणि शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान होऊ शकते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला एका आश्वासक व तरुण चेहर्याची गरज आहे, आणि ती गरज रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी चळवळ व शेतकरीवर्गाच्या भल्यासाठी विदर्भातून रविकांत तुपकर आणि पश्चिम महाराष्ट्रातून राजू शेट्टी हे दोन्हीही नेते लोकसभेत जाणे गरजेचे आहे. हे दोन नेते पराभूत झाले तर मात्र शेतकर्यांसाठी जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरण्यासाठी कुणी पुढे येणार नाही, अशी वैचारिक भावना शेतकरी चळवळीतील युवा कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
———-