– कडक उन्हामुळे उमेदवारांची दमछाक; मतदारांपर्यंत पोहचणे होतय कठीण!
पुणे (वैष्णवी मांडेकर) – उन्हाचा तडाखा वाढल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक होताना पहावयास मिळते आहे. शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार्या लक्ष्यवेधी लढतीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच उन्हाचा पारा वाढल्याने उमेदवार आणि कार्यकर्तेही मतदारांपर्यंत आपलं चिन्ह पोचवण्यासाठी कसरत करावी लागते आहे. तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता सर्वच उमेदवारांनी सभा, मेळावे याऐवजी गाठीभेटी, कोपरा सभा घेण्यावर भर दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळा सुरू झाला असून अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, अशातच शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार त्यांच्याबरोबर पक्षातील नेते व कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जाऊन कोपरा सभा घेऊन भरउन्हात प्रचार करीत आहेत. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापायला सुरुवात होऊन प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिरुर मतदार संघांवर लागले आहे. दोन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्यापुढे आता कडक उन्हाचे संकट उभे राहिले आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला पक्षांना पर्यायच उरला नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण मतदार आहेत.तर हडपसर आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघात शहरी मतदार आहेत. सध्याच्या तळपत्या उन्हात मतदारांपर्यंत प्रचारासाठी जाताना सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर!
सोशल मीडिया खूपच अधिक प्रभावी असल्यामुळे सोशल मीडियातून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवाराच्या समर्थनार्थ कार्यकर्ते दर अर्ध्या तासाने काहीतरी पोस्ट व्हायरल करत आहेत. गाठीभेटी, त्या दरम्यान होणारे महत्त्वाचे संवाद याचे व्हिडीओ काही तासांत मतदारसंघातील विविध ग्रुपवर तातडीने येतात. राजकीय पक्षांनी सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी नेमणूक करताना तरुणांना संधी दिली. ते आपल्या नेत्यांचे विचार, दिवसभराचे नियोजन काही क्षणातच व्हाटसअॅप, फेसबुक, एक्सवर प्रसारीत करीत आहेत.