चिखली (महेंद्र हिवाळे) – जिल्हा पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन गुढीपाडव्याच्या सणालादेखील रेशन न मिळाल्याने गोरगरिब जनतेतून तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. मेरा खुर्द येथे दोन रेशन दुकाने आहेत. परंतु यापैकी एकाही दुकानावर रेशनचा माल वाटप झाला नाही. त्यामुळे आजचा हा सण गरिबांना गोडधोडविना साजरा करावा लागला. इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून आल्याने ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, मेरा खुर्द येथे चार ते पाच दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने रेशनचा माल पाठवला, परंतु डाटा एन्ट्री झाली नसल्यामुळे सदर माल दुकानदारांनी वाटप केला नसल्याचे कळते. परंतु, काल (दि.८ एप्रिल) पुरवठा विभागाने डाटा एन्ट्री करून सदर दुकानदारांना माल वितरीत करण्याचे ऑनलाईन आदेश दिले होते. आज पूर्ण जग हे डिजिटल होत असताना रेशन दुकानसुद्धा डिजिटल झाले आहे. परंतु वितरकांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे दुकानदार यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांचा मेसेज पाहिलाच नाही, त्यामुळे ऐन सणाच्या दिवशीसुद्धा रेशनच्या मालाचे वाटप मेरा खुर्द आणि परिसरामध्ये झालेच नाही.
काही दुकानदारांनी तर आम्ही पुरवठा अधिकार्यांचा मेसेजच पाहिला नाही, अशी निर्लज्ज प्रतिक्रिया दिली आहे. मेरा खुर्दमध्ये सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. तसेच, सर्वच समाज बांधव एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. हे सण गोरगरिब जनतेने गोडधोड खाऊन साजरे करावेत म्हणून, शासनाने ०४ तारखेलाच डाटा एन्ट्री करून दिली. परंतु, वितरकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे गोरगरिबांना रेशन मिळालेच नाही. याबाबत तालुका पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, मागील तीन महिन्याची साखरवाटप बाकी आहे. त्यामुळे माल वितरित केला नाही, असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले. तीन महिन्याचा माल ऑनलाईनच्या जमान्यामध्ये कसा बाकी राहिला हेसुद्धा चर्चेचा विषय होऊ शकतो, आणि सणासुदीला पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लाभार्थ्यांना रेशन मिळू शकले नाही, याबद्दल गोरगरीब जनता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलच तीव्र संताप व्यक्त करत होती.