BuldanaBULDHANAKhamgaonMEHAKARVidharbha

बुलढाणा, अकोला जिल्ह्याला गारपिटीने पुन्हा झोडपले!

– खामगाव, मोताळा तालुक्यांना मोठा तडाखा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा व अकोला जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने आज पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने शेतकर्‍यांवरील या संकटाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता. या गारपिटीमुळे खामगाव, मोताळा तालुक्यातील कांदा, ज्वारी, आंबा, लिंबू व केळी या पिकांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

खामगाव तालुक्यासह काही भागात आज तुफान अवकाळी पाऊस बरसला. गारा व वादळासह झालेल्या लेल्या पावसाने कांदा, ज्वारी, केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याखाली तर अक्षरशः सडा पडला होता. वादळी वार्‍याने काही गावातील गोरगरिबांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली आहेत. संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. मेहकर तालुक्याला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर, सायवणीसह इतरही भागात आजच्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही भरली नाहीत तर पाणीटंचाई सध्या डोके काढत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकर्‍यांची मदार रब्बी व उन्हाळी पिकांवर होती. त्यामुळे रब्बी ज्वारी, कांदा तसेच फळबागाची लागवड केलेली आहे. परंतु आज खामगाव तालुक्यातील काळेगाव, रोहणा, गणेशपूर, निरोड, वरणा लोखंडा, घाणेगाव, पिंपळगाव राजा व इतर भागात मोठ्या प्रमाणात वार्‍यासह अवकाळी पाऊस बरसला. यामुळे कांदा, ज्वारी, केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा तर अक्षरशः सडा पडला होता. फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील लोखंडा गावात वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेलीत. गणेशपूर, निरोड शिवारात तर गारांचा अक्षरशः थर साचला होता. तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगावसार्कशा परिसरासह इतरही भागात जोरदार गारपीट झाली. मोताळा तालुक्यातील महाळुंगी जहागीर व परिसरातही गारपीट व वादळाने चांगलाच तडाखा दिलेला आहे. अचानक आलेल्या या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरी या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी रास्त मागणी शेतकरी करीत आहेत. तर या अगोदर झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांना मिळालेली नाही, याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

उष्णतेपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा!

दरम्यान, एका बाजूला बुलढाणा व अकोला जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला होता. बर्‍याच ठिकाणी तापमानाचा पारा हा ४० अंशावर गेला होता. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशाच्या आसपास गेला होता. त्यामुळे नागरिक व जनावरांच्या अंगाची काहिली सुरु झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.


यंदा देशात चांगला पाऊस होणार!

अशातच सर्वांसाठी एक खूशखबर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवली आहे. देशात यंदा सरासरीच्या १०२ टक्के सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या एल निनो कमकुवत होत आहे आणि ला निनाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पावसासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!