हिंमत असेल तर पक्ष सोडा, अन् माझ्यासमोर अपक्ष लढून दाखवा; माझ्याशी फाईट नाही म्हणता अन् उठता बसता माझे नाव घेता?
– माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन हजारो समर्थकांच्या साक्षीने तुपकरांनी सिंदखेडराजा मध्ये फोडला प्रचाराचा नारळ
– ‘मी २२ वर्षे केलेल्या कामाची मजुरी म्हणून मला तुमचे एक मत द्या’; शेतकरी-कष्टकर्यांना तुपकरांची हातजोडून विनंती!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – रविकांत तुपकर यांची माझ्यासमोर लढण्याची लायकी नाही, असे विद्यमान खासदार म्हणत आहेत. त्यांची जर माझ्याशी फाईट नाही तर मग ते वारंवार माझंच नाव का घेतात? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आज गावखेड्यातील व शहरातील सर्वसामान्य नागरिक माझ्या पाठीशी तन-मन-धनाने उभा आहे. लोक स्वतःहून पैसे देत आहेत, समोर येत आहेत. माझ्या वाट्याला सर्वसामान्यांचे जे प्रेम आले ते तुमच्या वाट्याला कधीच येऊ शकत नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर पक्ष सोडा आणि माझ्याप्रमाणेच अपक्ष म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे जाहीर आव्हान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नामोल्लेख टाळून शिंदे गटाचे उमेदवार तथा मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना दिले. तसेच, मी २२ वर्षे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी जीवावर उदार होऊन काम केले आहे. माझ्या कामाची मजुरी म्हणून यंदा मला तुमचे एक मत द्या, असे हातजोडून आवाहनदेखील तुपकरांनी जिल्ह्यातील शेतकरी व कष्टकरीवर्गाला यावेळी केले. हे बोलताना तुपकर हे भावविभोर झाल्याचे पाहून अनेक शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हजारो नागरिकांच्या साक्षीने आज (दि.९) गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेतकर्यांचा कणखर बाणा.. निवडून आणा ‘पाना’, अशा घोषणा देत नागरिकांनी सिंदखेडराजा नगरी दणाणून सोडली होती. विशेष म्हणजे, अनेकांनी ‘एक नोट एक वोट’ या तत्त्वानुसार निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्यासाठी रांग लावली होती. तुपकर यांची सिंदखेडराजा नगरीतून भव्य रॅली निघाली. ही विराट रॅली शेतकर्यांच्या विजयाचे संकेत देणारी ठरली. झालेल्या जाहीर सभेत तुपकरांनी सांगितले की, ही लढाई सर्वसामान्य जनतेची लढाई आहे. आज सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यानेच लोकसभेच्या रिंगणात उभा आहे. जात, धर्म, पक्षावर ही निवडणूक नाही तर यावेळी आपले प्रश्न, आपल्या समस्यांवर ही निवडणूक होणार आहे. आज सर्वांच्या साक्षीने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे प्रचाराचा नारळ फोडला असून, ०४ जूनरोजी विजयाचा गुलाल घ्यायलाही येथेच येईल, अशी ग्वाहीदेखील रविकांत तुपकरांनी दिली.
गेल्या पंधरा वर्षात सिंदखेडराजा, लोणार, शेगाव, संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ मेहुणाराजा या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसह जिल्हाचादेखील विकास खुंटला आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यात विकास नव्हे तर जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे, असा आरोप यावेळी त्यांनी केला. विद्यमान खासदार म्हणजे दुर्मिळ काका आहे, ते कधीमधी दिसून येतात म्हणून दुर्मिळ आहेत. गेल्या २२ वर्षात मी जे काम केलं त्या कामाची मजुरी म्हणून एक मत मागत आहे. २२ वर्षात मी फक्त शेतकर्यांसाठीच लढलो असे नाही तर शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, अतिक्रमणधारक, आदिवासी, बारा बलुतेदार व शहरी नागरिक अशा सर्वच घटकांसाठी मी काम करत आलो आहे, त्यामुळे खर्या अर्थाने हा लढा आता ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ असा झाला आहे. विरोधक प्रचंड धनशक्तीचा वापर करतील, दादागिरी करतील पण त्यांची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पैशाचे आमिष दाखवणे व धमक्यांचे फोन करणे बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारादेखील यावळी रविकांत तुपकरांनी दिला. माझ्या विरोधात खोटा-नाटा प्रचार करत आहेत. चुकीच्या अफवा पसरवत आहेत, परंतु ही गद्दारांची फौज आता मला रोखू शकत नाही. देवस्थानांची, मंदिरांची जागा हडप करणारे, समृद्धीतून कोट्यवधीची माया कमवणारे, कमिशनबाज आता सर्वसामान्यांचा आवाज दाबू शकत नाही. आपल्या हाती आता सर्वच नट बोल्ट खोलणारा आणि कसणारा पाना आला आहे. पंधरा वर्षे जुनी झालेली खटारा बंद पाडा, संसदेत नवा चेहरा पाठवा, तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी मी संसदेत प्राणप्रणाने लढेल, असा विश्वास यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना दिला. स्वतःच्या घरची चटणी-भाकर खाऊन, आपल्या स्वतःचा पैशांची पदरमोड करून प्रचार करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. जनतेचा कणखर बाणा…निवडून आणा ‘पाना’ असा नारा देत, नव्या संसदेत नवा चेहरा पाठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
———-