बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील विठ्ठल-रूख्मिणी मंदीरावर प्रसाद म्हणून वाटण्यात आलेल्या भगरीतून विषबाधा होऊन तब्बल दोनशे ग्रामस्थ अत्यवस्थ झाले होते. या दुर्देवी घटनेची बातमी सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित करून राज्यातील प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. या विषबाधित ग्रामस्थांसाठी देवासारखे धावून जात त्यांना मदतीचा हात देणार्या देवदुतांचा आज मातोश्री अर्बन बँकेच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, बुलढाणा जिल्हा दौर्यावर आलेल्या व घणाघाती सभा घेणार्या शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील या घटनेचा चिखलीतील जाहीरसभेत उल्लेख करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केलेली सविस्तर बातमी वाचली होती, हे विशेष.
दिनांक २२ फेब्रुवारीरोजी रात्री सहा वाजता सोमठाणा खापरखेडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने एकादशी उपवास असल्यामुळे संध्याकाळचे फराळासाठी भगर व आमटी करण्यात आली होती. ही भगर खाण्यात आल्याने महिला, पुरुष व लहान मुले यांना अचानक मळमळ व उलटी होणे असा त्रास सुरू झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बिबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी मदत म्हणून देवदूत ठरलेल्या बिबी येथील खाजगी डॉक्टर असोशियशन, मेडिकल असोशियन,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी कसलाही विचार न करता एक माणुसकी धर्म म्हणून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा मातोश्री महिला अर्बन यांच्यावतीने सत्कार आज भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
भगरीतून झाली सोमठाणा येथील विषबाधा; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल होणार!