Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

गद्दारांना पन्नास खोक्यांचा ‘हमीभाव’; शेतमालाचे काय?

– शेतमालाला भाव नसल्याने जिजाऊंच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या दुर्देवी!
– या जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नाहीत, हे ‘आपलं सरकार’!

बुलढाणा/चिखली (बाळू वानखेडे) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी गद्दारी करण्याचा गद्दारांना तब्बल पन्नास खोके इतका हमीभाव मिळाला. तुमचे खोके तुम्हाला लखलाभ; परंतु, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. शेतमालाला भाव नसल्याने जिजाऊंच्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गद्दारांना पन्नास खोके मिळाले, पण शेतमालाच्या भावाचे काय? असा थेट सवाल करत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना गद्दारांवर जोरदार टीकास्त्र डागले. सोमठाणा (ता. लोणार) येथील विषबाधेच्या घटनेचा उल्लेख करत, विषबाधा झालेल्या गोरगरिबांना डॉक्टर मिळत नाही, हे असले सरकार राज्यात आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिखलीत भव्य जनसंवाद सभा पार पडली. या सभेला कट्टर शिवसैनिकांसह शेतकरी, कष्टकरी व जिल्हावासीयांची प्रचंड गर्दी उसळली होती. चिखलीतील गर्दीचे सर्व रेकॉर्ड या सभेने मोडित काढले. याप्रसंगी शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सर्व नेत्यानी राज्यातील शेतकरीविरोधी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जिल्ह्यातील शिवसेना बंडखोरांवरदेखील टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरे म्हणाले, की जी माणसं पक्षात मोठी झाली ती गेली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं, ती जनता माझ्यासोबत आहे. हे ऐश्वर्य माझ्यासोबत आहे. इथे एकसुद्धा भाड्याने आणलेला माणूस नाहीये, फक्त खुर्च्या भाड्याने आणल्यात. पण त्यावर बसणारा एकसुद्धा भाडखाऊ नाही. बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नाहीत. हे ‘आपलं सरकार’!, असा टोला हाणून, ते म्हणाले की, जेव्हा वाजपेयी मोदींना कचर्‍याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्यावेळी एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना साथ दिली होती. माझं घराणं अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. अमित शहा, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शहा विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? महाराष्ट्राचं ओरबाडून जर गुजरातला नेणार असाल, तर भाजपच्या पेकाटात पहिली लाथ माझा महाराष्ट्राची जनता घालेल. जनतेला घर दिलं, छप्पर दिलं म्हणताय. पण आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाचं छप्पर उडालंय. मग काय चाटायचंय तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नसलेल्या टोणग्यांच्या गुलामगिरीत ‘भारतमाता’ टाकणार का? आज बुलढाणा लोकसभेतील चिखली विधानसभेत शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहात ‘जनसंवाद‘ मेळावा पार पडला. हा संवाद म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरविणारा ’कुटुंबसंवाद’ आहे. दिल्लीच्या पातशाही वृत्तीला उलथवून लावणार तो माझ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रच!’ हा विश्वास ह्यावेळी ठाकरे ह्यांनी जनसमुदायसमोर व्यक्त केला.

ठाकरे यांचा घणाघात…

  • – जी माणसं पक्षात मोठी झाली ती गेली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं, ती जनता माझ्यासोबत आहे. हे ऐश्वर्य माझ्यासोबत आहे.

  • – घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या पाव-पाव उपमुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन विचारावं, जनतेला सरकार कुणाचं आवडलं होतं?

  • – बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नाहीत. हे ‘आपलं सरकार’!– केंद्र सरकारने उद्योगपतींचे चाळीस लाख कोटींचे कर्ज माफ केले, ह्यात माझ्या बळीराजाचे दोनवेळा कर्ज माफ झाले असते.

  • – कितीही मोठे हुकूमशाह आले तरी त्यांना गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रात आहे.

पुढे ठाकरे म्हणाले, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो. पण अशोक चव्हाण, अजित पवार या सारख्यांना पक्षात घेऊन भाजप मोठे करत असल्याने तुम्ही तरी कशासाठी लढता? असा खोचक सवालही त्यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारला. शेतमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत चालले असून, याची कोणतीही हमी राहिल्याचे दिसत नसून रोजगार हमी योजनाच काय ती शिल्लक राहिल्याचेही ठाकरे म्हणाले.

देशात आता लोकशाही शिल्लक राहील की नाही याची चिंता सतावत असून, भाजपच्या हुकूमशाहीविरूध्द लढणार आहे. घराणेशाहीविरूध्द बोलणार्‍यांनी अमित शाह यांचा मुलगा जय शाह याचे क्रिकेटमधील योगदान काय? हे सांगावे. निवड़णूक आयोगाचे नाव बदलून ‘धोंड्या’ ठेवण्यात आले आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!