‘जरांगे हेकेखोर, रोज पलटी मारतो, अनेक गुप्त बैठका घेतो’; हभप. अजय महाराज बारस्करांचे धक्कादायक आरोप
– जरांगे मराठ्यांची फसवणूक करताहेत, संत तुकारामांचाही अपमान केला – बारस्कर महाराजांचे गंभीर आरोप
मुंबई (खास प्रतिनिधी) – मनोज जरांगे कायम पलटी मारतात, खोटं बोलतात, असा आरोप करत मनोज जरांगे यांचे कोर कमिटीचे सदस्य असलेले हभप. अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार हल्लाबोल केला. हभप. बारस्कर यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराज यांचा अवमान केला असल्याचाही आरोप हभप. बारसकर यांनी केला आहे. जरांगे यांनी कुणासोबत गुप्त बैठका घेतल्यात, असा सवाल करत, जरांगेंनी आपल्या हेकेखोर व प्रसिद्धीपिसाट वर्तनामुळे मराठ्यांचे वाटोळे लावले आहे, असेही बारस्कर महाराज म्हणालेत.
हभप. अजय महाराज बारस्कर म्हणाले, की २३ डिसेंबरला मनोज जरांगे यांनी गुप्त मिटिंग काहींसोबत केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय? सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता. मी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी असे आरोप करतोय, असे अजिबात नाही. मी कीर्तनाचे पैसे वगैरे घेत नाही. मात्र, मनोज जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसापासून खदखद होती. ती आज मी व्यक्त करत असल्याचे हभप. अजय महाराज बारस्कर म्हणाले. यामुळे मला वारंवार फोन येत आहे, गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही, असेदेखील बारस्कर महाराज यांनी सांगितले. ‘मनोज जरांगे हे अहंकारी आहेतच, पण त्यांच्या मुलांमध्येही हा अहंकार भरून राहिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगेंच्या मुलीने म्हटले की, ‘माझ्या वडिलांनी देवालाही झुकायला भाग पाडले’. त्या लहान मुलीने उच्चारलेले हे वाक्य जरांगेंच्या अहंकाराच्या शिकवणुकीतून आले’, असाही आरोप अजय बारसकर यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यापासून माझ्यावर फुटीरतेचे आरोप लावले जात आहेत. मी सरकार आणि छगन भुजबळ यांचा एजंट आहे, असे सांगितले जात आहे. पण मी भाजप पक्ष आणि छगन भुजबळ यांच्यावर जहाल टीका केली आहे. छगन भुजबळ माझे मित्र नाहीत. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असेही बारसकर यांनी जाहीर केले.
जरांगेचे १०० अपराध भरले!
मूळचे कीर्तनकार असलेले हभप. बारसकर यांनी अभंग आणि पुराणातील उदाहरणे देऊन आपला मुद्दा स्पष्ट केला. शिशूपालाचे १०० अपराध भरले, हे भगवान श्रीकृष्णाने म्हटले होते. त्याप्रमाणे या जरांगेचेही १०० अपराध आता भरले आहेत. मध्यंतरी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मी आंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे पाटील यांनी संताचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे मी दुःखी झालो. मला हे सहन झाले नाही, त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे, असेही बारसकर यांनी सांगितले. बारसकर पुढे म्हणाले की, जर मी बसमधून प्रवास करत असेल आणि मला जर कळलं की बसचा चालक मद्य प्यायलेला आहे. तर सर्वात आधी मी बसमधून उतरेल आणि इतर प्रवाशांनीही बसमधून उतरावे, अशी बोंब ठोकेल. आज मराठा समाजाच्या आंदोलनाचा नेतृत्व करणारा व्यक्ती असाच नशेत आहे, हे मला आवर्जून सर्वांना सांगायचे आहे, अशी टीका हभप. बारसकर महाराज यांनी केली.
मनोज जरांगे यांनी मागितली संत तुकाराम महाराजांची माफी!
हभप. अजय बारसकर यांनी आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील संताबद्दल केलेल्या विधानाबाबत माफी मागितली. ते म्हणाले, मी उपोषणाला बसलो असल्यामुळे त्या चिडचिडीतून माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असण्याची शक्यता आहे. पण मी संताबद्दल नाही तर बारसकर यांना उद्देशून काही बोललो होतो. पण आता माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. पण अजय बारसकर हे मॅनेज झालेले आहेत, असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.