सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील वाघजाई येथील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सरपंच गजानन सानप यांनी बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणामुळे हादरलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजाने आश्वासन देऊन त्यांचे उपोषण स्थगित केले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने सरपंच गजानन सानप यांच्यावर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ आली असून, ते ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसलेले आहेत.
सविस्तर असे की, वाघजाई फाटा ते जळगाव गावापर्यंत डांबरीकरण व पुलासह हे काम सार्वजनिक उपविभाग देऊळगावराजा यांच्या अंतर्गत मागील वर्षी नाथाभाऊ दराडे यांनी केले असून, त्यांनी काम निकृषदर्जाचे व इस्टीमेटनुसार केले नाही व गावातील काम अपूर्ण सोडले. सांड पाणी जाण्यासाठी नाली काढल्या नाही. यामुळे गावातील पाणी रोडवर येऊन डबके साचून आरोग्य धोक्यात येत आहे व गाड्या स्लीप होऊन काहीना अपंत्व आले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी सरपंच यांनी सबंधित विभागाला निवेदन देऊनसुद्धा काम पूर्ण केले नाही. सबंधित अभियंता यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या मुळे सरपंच यांनी २९/९/२३ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते, पण सिंदखेडराजा विधानसभेचे माजी आमदार तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर व किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या मध्यस्थीने व सबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी हे उपोषण काही लोकांच्या व भूमी अभिलेख विभाग यांच्या काही अडीअडचणीमुळे सबंधित भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी पूर्ण करून घेऊ व अतिक्रमण उठवून काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण एका प्रकारची सरपंच यांची फसवणूक करून स्थगित केले होते.
तेव्हापासून आज ५ महिने झाले तरी सबंधित विभाग व ठेकेदार यांनी हे काम पूर्ण केले नाही. हा रोड गावात अत्यंत खराब झाला असून तालुका ठिकाणी जाणे येण्यासाठी वाहन ाारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरपंच यांनी सबंधित विभाग व ठेकेदार यांना फोन करून काम चालू करण्याचे आवाहन केले तरी त्यांनी दुर्लक्ष केले आहे. हे काम पूर्णत्वाकडे न्यावे, यासाठी सरपंच यांनी विभागाकडे लेखी पत्र देऊन दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करा, नाहीतर १९ फेब्रुवारीपासून उपोषणास बसू असे पत्र दिले होते. त्यांनी काम पूर्ण न केल्यामुळे परत सरपंच उपोषणास बसले आहेत. त्यामुळे परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे.