साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी माजी सरपंचाचा आमरण उपोषणाचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गावागावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. मुख्य रस्त्यावर गावागावात वरली मटक्याची दुकान जसे भजेजिलेबीची दुकान असतात त्याप्रमाणे ठिकठिकाणी थाटली गेली आहेत. अवैध दारुची विक्री मोठया प्रमाणात सुरू असून जुगार वरली मटक्याच्या नादाला तरुण , किशोर वयीन मुले मोठया प्रमाणात वळली आहेत. पोलीसाच्या अभयाने जुगाराचे धंदे सैराट झाले असून, जुगाराच्या आहारी तरुणपिढी बर्बाद होत असून, पोलिसांनी मूग गिळलेले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या अभयाने सुरू असलेले हे अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजप कोर कमिटीचे सदस्य तथा मलकापूर पांग्रा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साबेर पठाण यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गावागावात अवैध धंद्यांना अक्षरशा ऊत आला आहे. वरली मटका खेळण्यासाठी लोक रोज मजुरी बुडवून दिवसभर खेळण्यासाठी थांबतात, त्यामुळे त्यांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. पोलीस मात्र याची चिंता न करता अवैध धंद्यांना अर्थपूर्ण पाठ बळ देत आहे. अवैध धंदे करणारे पोलिसांसोबत त्यांची उठबैस असल्याने सर्वसामान्य लोक अवैध धंद्यांची तक्रार करण्यास धजावत नाही. पूर्वी चोरीछुपे असलेले धंदे आता मुख्य रस्त्यावर आले आहेत, असे असताना कारवाईसाठी पोलिसांना हे अवैद्य धंदे का दिसत नाहीत, असा संतप्त सवालदेखील या निमित्ताने उभा राहतो. अवैध धंदे सुरू असल्यामुळे चोऱ्याचपाट्या होत नाही लोक गुतून राहतात, असा अजब प्रतिक्रिया अवैध धंद्यांवर पांघरून घालण्यासाठी पोलिसांकडून देण्यात येतात. त्यामुळे धंद्यावर कारवाई कशी होणार, साखरखेडा पोलीस स्टेशनला लागूनच बीबी पोलीस स्टेशन आहे. या ठिकाणीदेखील क्लब सुरू आहे. मात्र पोलीस कारवाई करत नाही. या संदर्भात तात्काळ कारवाई झाली नाही तर येथे एक तारखेपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनाद्वारे माजी सरपंच साबेर पठाण यांनी दिला आहे.