Head linesLONARVidharbha

भगरीतून झाली सोमठाणा येथील विषबाधा; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल होणार!

– पोलिस व महसूल प्रशासनाच्या समयसूचकतेमुळे वाचले ग्रामस्थांचे प्राण

बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील विषबाधा प्रकरण हे विषारी भगर खाल्ल्यामुळे घडले असल्याचे समोर आले असून, भाविकांना वाटण्यासाठी बनविण्यात आलेली ही भगर ज्या किराणा दुकानातून खरेदी करण्यात आली होती, तेथील नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्याबाबतचा अहवाल आला की संबंधित किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, आज पोलिस व महसूल विभागाच्या वरिष्ठांनी सोमठाणा येथे जाऊन पाहणी केली, तसेच माहिती घेतली. या दुुर्देवी घटनेत तिघा ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. काहींवर मेहकर तर काहींवर बिबी येथेच वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विठ्ठल-रूख्मिणी मंदिरातील उपवासाच्या फराळातून तब्बल दोनशे ग्रामस्थांना विषबाधेची ही बातमी सर्वप्रथम ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तसेच, रात्रभर प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागली होती.

काल (दि.२०) रात्री ठीक ६:०० वाजता सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने उपवास असल्यामुळे भगरचा प्रसाद वाटप करण्यात आला होता. ही भगर खाण्यात आल्याने महिला- पुरुष व लहान मुले यांना अचानक मळमळ व उलटी होणे असा त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी बिबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारादरम्यान तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले, तर काहींना ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे दाखल करण्यात आले. परिस्थिती इतकी बिकट होती की दवाखान्यामध्ये आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे बिबी येथील खाजगी डॉक्टर असोसिएशन यांना बोलावण्यात आले होते. या घटनेने पुन्हा एकदा बिबी ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रूग्णालयाच्या अनागोंदी कारभाराकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वैद्यकीय उपचारानंतर काही ग्रामस्थांना प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने त्यांच्या गावी पाठवण्यात आले तर काहींना त्रास कमी होत नसल्याने त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. या घटनेत महसूल प्रशासन व पोलिसांनी कमालीची समयसूचकता दाखवली. मेहकरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, बिबी पोलिस अधिकारी, एसडीपीओ यांनी तातडीने हालचाली करून परिस्थिती आटोक्यात आणली.


आज (दि.२१) सकाळी ११ वाजता सोमठाणा येथे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे व पीएसआय बाष्ठेवाड, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सोळंकी यांनी सोमठाणा मंदिर परिसर येथे भेट देऊन गावकरी, सरपंच यांच्याशी चर्चा केली. त्या ठिकाणी काल प्रसाद म्हणून जी भगर तयार करण्यात आली होती त्या भगरचे व किराणा सामानाचे सॅम्पल घेण्यात आले. या सॅम्पलचा लॅब रिपोर्ट आल्यानंतर ज्या किराणा दुकानातून ही भगर खरेदी करण्यात आली होती, त्या किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अधिक तपास पोलिस व अन्न, औषधी प्रशासनाचे अधिकारी करत आहेत.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!