बुलढाणा/दे. माळी (संजय निकाळजे) – प्राचीन काळापासून चालत आलेल्या कला आजही जीवंत ठेवलेल्या आहेत. जागरण गोंधळ घालणाऱ्या वाघ्या मुरळीचा आवाज आजही ग्रामीण भागात गुंजतो आहे. तोच घुंगराचा नाद देऊळगाव माळी येथे ऐकायला मिळाला. निमित्त होते, वाघ्या मुरळीची राज्यस्तरीय स्पर्धा. आणि याच स्पर्धेत देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथील शिव मल्हार वाघ्या मंडळाला प्रथम येण्याचा बहुमान मिळाला.
बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लुप्त होण्याचे मार्गावर आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलाकार अजूनही ही कला जीवंत ठेवण्याचे काम करत आहे. देऊळगाव माळी येथे १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, नाशिक, जळगावसह विविध जिल्ह्यातून वाघ्या मुरळी संचांनी सहभाग नोंदवला. या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमामधून स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा, लेक शिकवा, व्यसनाधीनता, ग्राम स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन, बालविवाह नको, एकत्र कुटुंब पद्धती, आई-वडिलांचा सांभाळ करा, वृद्धाश्रम नको, अशा अनेक समाज प्रबोधनाच्या गीतांच्या माध्यमातून समाज जागृती करण्यात आली. वाघ्या मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हटले जाते, अपत्य प्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येऊनही जगत नसेल तर खंडोबाला नवस करणारे माता पिता मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन. असा नवस करायचे. नवसानंतर जन्मास आलेले मुल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या तर मुलगी असल्यास तिने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे. असा वाघ्या मुरळीचा इतिहास असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण 11 ठाणे असून तेथे लग्न मुंजीनंतर वाघ्या मुरळीकडून जागरण घातले जाते. अशी संस्कृती महाराष्ट्रात जोपासली जाते.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन हभप बद्रीनाथ गिरी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शाखा अभियंता नारायण बळी होते. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, पा स उपाध्यक्ष तुकाराम मगर, पो पा गजानन चाळगे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, शाहीर ईश्वर नगर, गजेंद्र गवई, परमेश्वर पाटील, जगन्नाथ लांडगे, डॉ बद्री मगर, मधुकर लोणकर महाराज, पत्रकार संजय निकाळजे (गायक), सुधीर पाटील जालना, संतोष हिवाळे जाफराबाद, गजानन जाधव आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तब्बल सात ते आठ तास चाललेला हा कार्यक्रम बघण्यासाठी अनेक श्रोत्यांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत शिव मल्हार वाघे मंडळ प्रथम क्रमांक, गुरुकृपा जागरण वाघे मंडळ केशव शिवनी दुसरे, शिव मल्हार वाघे मंडळ बोरगाव काकडे तिसरे, जय मल्हार वाघे मंडळ मलकापूर पांगरा चौथे, जय मल्हार वाघे मंडळ भराडखेड जाफराबाद पाचवे, तर मार्तंड भैरव वाघे मंडळ सहावे, क्रमांकाचे मानकरी ठरले. विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कैलास राऊत, अनिल कलोरे व संजय जाधव यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन शिव मल्हार वाघे मंडळाचे संयोजक सुरेश जाधव, बद्री चाळगे, शंकर चाळगे, श्रीकृष्ण ढवळे, सुखदेव वानेरे, मारुती चाळगे, पवन फलके ,सखाराम काळे, विशाल चाळगे, गणेश तायडे, कैलास चाळगे व त्यांच्या वतीने करण्यात आले होते.