Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना जेलमध्ये डांबण्याचा राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचा इरादा न्यायदेवतेने हाणून पाडला!

– न्यायालयाचा निर्णय येताच तुपकरांकडून निर्धार रथयात्रेची घोषणा
– खामगाव तालुक्यातून २२ फेब्रुवारीला होणार सुरुवात; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ताकदीने पिंजून काढणार!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावरील विविध शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांची जंत्री गोळा करून आणि त्यांना ‘सराईत गुन्हेगार’ असे संबोधून, जिल्हा सत्र न्यायालयाकडे पोलिसांकरवी तुपकरांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जामीन रद्द करणे व स्थानबद्ध करण्याची मागणी घेऊन गेलेल्या राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला पुन्हा एकदा तोंडावर आपटावे लागले आहे. बुलढाणा पोलिसांनी दाखल केलेला पुनरनिरीक्षण अर्ज न्यायदेवतेने अर्थात जिल्हा सत्र न्यायालयाने गुणवत्तेच्या निकषावर फेटाळून लावला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला जोरदार झटका बसला असून, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुपकरांना जेलमध्ये घालून त्यांचा जिल्ह्याशी संपर्क तोडण्याचा सरकारचा डाव चांगलाच उधळला गेला आहे. पहिल्यांदा न्यायदंडाधिकारी न्यायालय व आता सत्र न्यायालयात तोंडघशी पडलेले हे सरकार आता उच्च न्यायालयात जाऊन तेथेही आपले थोबाड फोडून घेणार नाही, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. राज्याचे सुज्ञ आणि शेतकरी चळवळीची महती जाणून असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलढाणा पोलिसांना उच्च न्यायालयात जाण्याची अनुमती देणार नाहीत, असेही जाणकार सूत्राने सांगितले आहे. न्यायालयाचा निकाल येताच रविकांत तुपकरांनी जिल्ह्यात निर्धार रथयायात्रेची घोषणा केली असून, दि.22 फेब्रुवारीपासून खामगाव तालुक्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. संपूर्ण जिल्हा ताकदीने पिंजून काढणार असल्याचे रविकांत यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी, लोकसभेत परिवर्तन करण्यासाठी ही निर्धार रथयात्रा असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आजवर विविध आंदोलने केली आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. याच दरम्यान रेल्वेरॊकॊ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून तुरुंगात पाठविण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालय, बुलढाणा येथे पुनरनिरीक्षण अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी यापूर्वी ७ व ८ फेब्रुवारीरोजी सुनावणी झाली. त्यानंतर १५ व १६ रोजी देखील याप्रकरणी युक्तिवाद झाला. न्यायालयाचा निकाल काहीही येऊ शकतो, वेळप्रसंगी आपल्याला तुरुंगात जाण्याची वेळसुद्धा येऊ शकते, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी १५ फेब्रुवारीरोजी निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. सर्वसामान्य जनता हीच आपली खरी संपत्ती आणि आपली खरी ताकद आहे, तुरुंगात गेलो तरी तुरुंगातून लोकसभेचा अर्ज भरणार आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणूक लढणार, असा निर्धार यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला होता. तर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनीदेखील रविकांत तुपकर यांना आपण तन- मन-धनाने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. या मेळाव्यानंतर रविकांत तुपकर न्यायालयात हजर झाले होते. १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या जोरदार युक्तिवादात सरकारी पक्षाने रविकांत तुपकरांना तुरुंगात ठेवण्याची मागणी केली. त्याला तुपकरांच्यावतीने त्यांच्या पत्नी ॲड.शर्वरीताई तुपकर यांनी जोरदार विरोध करत तुपकरांची बाजूने जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे याप्रकरणी आज नेमका काय निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.

दरम्यान, जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे तुपकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर समर्थकांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर रविकांत तुपकरांचे जोरदार स्वागत केले. या निकलानंतर रविकांत तुपकर यांनी लगेचच निर्धार रथयात्रेची घोषणा केली. २२ फेब्रुवारीला खामगाव तालुक्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. खामगाव तालुक्यातील मांडका गावातील लक्ष्मणगिरी महाराजांचे मंदिरात दर्शन घेऊन या निर्धार यात्रेला सुरुवात होणार आहे. तर रात्री पाळा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर २३ व २४ फेब्रुवारीला ही यात्रा जळगाव जामोद तालुक्यात तर २५ व २६ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर, २७ व २८ शेगाव तालुक्यात व २९ फेब्रुवारी पुन्हा ही यात्रा खामगाव मध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर घाटावर ही यात्रा येणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण जिल्हा ताकदीने पिंजून काढत जिल्ह्यातील सर्वसामान्य,शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि तरुणांच्या हक्काचे प्रश्न घेऊन, विकासाच्या प्रश्नांवर आवाज उठविणार आहोत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि तरुणांनी या निर्धार यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील रविकांत तुपकर यांनी केले आहे.


अखेर सत्याचाच विजय झाला – रविकांत तुपकर

न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला आहे. काही सत्ताधारी नेत्यांनी मला तुरुंगात डांबण्याचा डाव आखला होता, पण तो आजच्या निर्णयाने उधळून लावला आहे. सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, तरुण तसेच गावगाडा आणि शहरातील नागरिकांचा आपल्या पाठीशी असलेला आशीर्वाद मला प्रत्येक संकटातून तारुण नेत आहे. सर्वसामान्य जनतेचा हाच आशीर्वाद आता जिल्हात परिवर्तन घडविणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी,तरुण, अडचणीत आहेत. शेतमालाला भाव नाही सिंचनाची सोय नाही, दुसरीकडे तरुणांसाठी रोजगार नाही. जिल्ह्यात मोठी एमआयडीसी नाही प्रोजेक्ट नाहीत, यूपीएससी-एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या अभ्यासिका नाहीत, एकंदरीत नानाविध अडचणी या जिल्ह्यात आहेत,अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या आणि अडचणींना वाचा फोडण्यासाठी आपण निर्धार यात्रा काढत आहोत, असे रविकांत तुपकरांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!