BuldanaBULDHANAChikhaliVidharbha

चिखलीतील विश्वकर्मा मंदीर येथे गुरूवारी प्रगटदिन व उद्योगदिन सोहळा

– आमदारांच्याहस्ते विश्वकर्मा भवन बांधकामाचे भूमिपूजन; दुपारी महाप्रसाद वितरण

चिखली (विनोद खोलगडे) – येथील प्रभू विश्वकर्मा मंदीर स्थळावर गुरूवारी (दि.२२) रोजी प्रभू विश्वकर्मा प्रगटदिन व उद्योगदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दयानंद थोरहाते (विवेकानंद आश्रम) हे राहणार आहेत. प्रगटदिनानिमित्त प्रभू विश्वकर्मा यांचे पूजन, यज्ञ आणि होमहवन आदी धार्मिक कार्यक्रमांसह शहरातून दुचाकी रॅली, शोभायात्रा, तसेच विश्वकर्मा भवन बांधकामाचे भूमिपूजन आणि महाप्रसादाचे वितरणदेखील केले जाणार आहे.

चिखली येथील खंडाळा रोड वायझडी तलावाजवळील तालुक्यातील एकमेव अशा सृष्टीचे रचियता प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदीरस्थळी या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांसह मान्यवरांच्या प्रबोधनाचेही आयोजन आहे. प्रगटदिनानिमित्त सकाळी ८ वाजता महायज्ञ, पूजाअर्चा व होमहवन पार पडेल. सकाळी ९ वाजता चिखली शहरातून भव्य दुचाकी रॅली व शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर ११ वाजता चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्याहस्ते विश्वकर्मा भवन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवा समितीचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दयानंद थोरहाते सर, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, नगरसेवक सुभाषअप्पा झगडे, व्हीव्हीएसएसचे जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन पातुरकर, सुतार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय खोलाडे, संत भोजलिंगकाका चरित्राचे अभ्यास प्रा.विजय रायमल यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित असून, सोबतच लकी ड्रॉमधून पाच भगिनींना पाच पैठणी आ.श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते प्रदान केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता भव्य महाप्रसाद सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी हजर रहावे, असे आवाहन श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवा समिती चिखलीद्वारे करण्यात आलेले आहे. विशेष करून तालुक्यातील समस्त सुतार समाजाच्यावतीने हा अधिकृत कार्यक्रम असल्याने समाज बांधवांनी इतरत्र आपला वेळ न घालविता, याच कार्यक्रमाला आवर्जुन यावे, असे आवाहनही आयोजकांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!