BuldanaBULDHANAHead linesLONARVidharbha

खापरखेड सोमठाणा येथे उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा

– परिसरात प्रचंड घबराट, विठ्ठल-रूख्मिणी मंदिरातील फराळ खाल्ल्याने झाली विषबाधा

बिबी (ऋषी दंदाले) – तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल – रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल २०० महिला व पुरूषांना विषबाधा झाली असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलिस व इतर ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर आहेत. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून, रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिसरात सद्या प्रचंड घबराट पसरली असून, आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे.

खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आज उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना ढाळवांत्या सुरू झाल्या. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. ही माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला होताच, त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरूषांना मिळेल त्या वाहनाने बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. परंतु, या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे बिबी येथील खासगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रूग्णालयात बोलावण्यात आले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. हे वृत्तलिहिपर्यंत अनेकांची प्रकृती चिंताजनक होती, व त्यांना मेहकर येथे हलवले जाण्याची शक्यता होती. धक्कादायक बाब अशी, की या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तेथे रूग्णांना टाकण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले होते. पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार मात्र या दुर्देवी घटनेने चव्हाट्यावर आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!