चिखली (कैलास आंधळे) – राष्ट्रमाता मॉसाहेब जिजाऊंच्या माहेरघरातील आपण मावळे आहोत. या जिल्ह्यात ३६ स्मारक असून, आपण भाग्यवान आहात तीन वर्षे छत्रपती शिवाजी महाराज या भूमित बागडले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मिरवायचा विषय नसून, रूजवायचा विषय असल्याचे मत शिवश्री प्रा.रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर युवकांनी निर्व्यसनी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दि. १७ फेब्रुवारी रोजी मेरा बुद्रुक येथे शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, राणा मंगलसिंग राजपूत होते.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. आपल्या ओघवत्या भाषणात प्रा.रामचंद्र पाटील पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज दिसण्यात महत्त्वाचे नाही तर असण्याला महत्व आहे. छत्रपतींचा ट्याट्यू हातावर लाऊन बिअर हातात घेणे ही घोर विटंबना आजचे युवक करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज परिश्रमातून होता येते, छत्रपती समजून घेता आले असते, मायबाप होणं सोपं आहे पालक होणं अवघड आहे, दगडात मूर्ती तयार करण्याचं कौशल्य शिल्पकारात असते. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर निर्व्यसनी राहावे लागते. त्यामुळे कुटूंब हरवत चालल्यामुळे शिवचरित्र सांगणे गरजेचे आहे. संततीसाठी संपत्ती जमा करण्यापेक्षा संपत्तीसाठी संतती जमा करणे गरजेचे आहे. महापुरुषांना कधीही हार होऊ नये म्हणून हार घालायचे असतात, भरकटत चाललेल्या पिढीमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची लस देण्यासाठी आलो असल्याचे शिवश्री पाटील यांनी सांगितले. बहुजन वाळूच्या ढिगार्यासारखे आहोत, भारताला स्वातंत्र मिळालं पण सुराज्य मिळाल्याचे दिसून येत नाही महापुरुषांना रक्ताचे वारसदार नसतात स्वतः मध्ये परिवर्तन करण्यासाठी जयंती साजरी करायची असते, छत्रपतींना देव माणू नका देव मानल्यास अंधभक्ती सुरू होईल जे स्वतः ला सामर्थ्यवान समजतात अशांना घाबरायचं नाही, असा आदर्श जिजाऊंनी पेरल्यामुळे स्वराज्य निर्माण होऊ शकले. खोपडीतला दुष्काळ अवघड असतो, देश आणि राष्ट्र यात फरक आहे जोवर देशप्रेमाचा भावना निर्माण होणार नाही तोवर गुलामी संपणार नाही. चप्पल बुट वातानुकूलित दुकानात विकले जातात तर आम्ही दररोज खात असलेला भाजीपाला धुळीमध्ये विकला जातो हे दुर्दैव आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विचाराची आज गरज असल्याचे शिवश्री पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खेडेकर यांनी तर आभार माजी सरपंच तथा शिवसेना नेते राजू पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परशुअन्ना पडघान, राजू पाटील, सागर पाटील, प्रभाकर गायकवाड, बाबू तोडे, गजानन मापारी, पत्रकार प्रताप मोरे, संदेश चव्हाण, राहुल हिवाळे, अश्विन अंभोरे तथा समस्त मेरा बुद्रुक येथील युवकांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे गजानन वायाळ यांनी यशस्वीरित्या आयोजन केले होते.
मेरा बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी!
मेरा बुद्रुक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी गावामधून शोभायात्रा निघून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पाणी व दुग्धाभिषेक केला गेला. या कलश मिरवणुकीत सर्व समाजातील लहान, थोर मंडळींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. तर मेरा बुद्रुक फाट्यावरील बालगोपाल शिवभक्तांनी सकाळपासूनच शिवजयंतीच्या निमित्ताने मारुती मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, देवी मंदिराचा परिसर साफसफाई करून एक अनोखी शिवजयंती साजरी केली. मारुती मंदिरात पूर्ण कृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी मेरा फाट्यावर लहान थोरापासून सर्वांचीच रेलचेल राहिली. तर मेरा बुद्रुक गावामध्ये ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह पूर्णाकृती पुतळ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मेरा बुद्रुक गावामधून निघालेल्या मिरवणुकीत गावातील सर्व समाजातील तरुणासह, पुरुष मंडळींनी सहभाग नोंदविला. या मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणासह, पुरुष मंडळींनीही अनेक गीतावर ठेका धरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकार आणि जयघोषाने मेरा बुद्रुक नगरी दणाणून गेली होती. या मिरवणुकीत ठिकठिकाणी महिला वर्गांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पूर्ण कृती पुतळ्याचे पूजन व अभिवादन केले. या मिरवणुकीत अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बुद्रुकचे बीट जमादार देडे साहेब यांनी मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.