अंढेरा (हनिफ शेख) – अंढेरा घाटात राजुरी स्टीलच्या वसुली अधिकार्याला लूटणार्या टोळीचा जालना गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथाने पर्दाफास केला असून, पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून होंडासिटी कारसह सहा लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, जीपीएस लोकेशनच्या सहाय्याने वसुली अधिकार्याच्या कारचा पाठलाग करण्यात आला होता, तर स्टील कारखान्यातील कामगारानेच दरोडेखोरांना टीप दिल्याचे उघड झालेले आहे.
सविस्तर असे, की जालना येथील लोखंडी सळ्या निर्मितीच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या राजुरी कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर श्रीमाली हे बुलढाणा जिल्ह्यातून वसुली करून १४ फेब्रुवारीच्या रात्री जालनाकडे येत होते. त्यांची कार बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा घाटामध्ये आडवून त्यांना बेदम मारहाण करून, त्यांच्याजवळील लाखो रुपयांची रोकड लंपास केली गेली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांचे व चालकाचे हातपाय बांधून त्यांना एका शेतात फेकून दिले होते. या घटनेने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकरणात अंढेरा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या वाटमारीच्या दरोड्यायामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी याप्रकरणात लक्ष घालून तपास चक्रे फिरवत या दरोड्याचा पर्दाफाश केला आहे.
हा दरोडा टाकण्याची टीप कंपनीतील एका कामगारानेच दिली असल्याचे आणि कंपनी मालकाला माहिती होऊ न देता वसुली अधिकार्यांच्या वाहनांना जीपीएस बसवून त्याची लोकेशन व इत्यंभूत माहिती दरोडेखोरांना पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या तपास पथकाने हा दरोडा १५ जणांच्या टोळीने घातला असल्याचा छडा लावला असून, त्यापैकी ५ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक होंडासिटी कार, रोख ६ लाख जप्त करण्यात आले असून, त्यांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.