BuldanaBULDHANAHead linesVidharbha

आंदोलनाच्या दणक्यामुळेच अवकाळी, गारपिटीची मदत मंजूर; आता श्रेय घेण्यासाठी काही नेते समोर येतील – रविकांत तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अवकाळी पाऊस आणि गारपिटीची मदत मजूर झाली आहे, निवडणूकीच्या तोंडावर ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल, हे आपल्या आंदोलनाचे यश आहे. आंदोलनाच्या दणक्यामुळेच ही मदत मिळणार आहे. मंत्रालय ताबा आंदोलनावेळी या मदतीसंदर्भातचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत दिले होते. तसेच अधिवेशनातही त्यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. परंतु आता काही नेते याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सावळी येथे ‘एल्गार परिवर्तन मेळाव्या’त आयोजित सभेत बोलतांना केले.
बुलढाणा तालुक्यातील धाडजवळील सावळी येथे १८ फेब्रुवारीरोजी एल्गार परिवर्तन मेळावा पार पडला. यावेळी तरुणांनी रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत करुन बैलगाडीतून मिरवणूक काढली. गावात ठीकठिकाणी तुपकरांचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षण केले. त्यानंतर आयोजित सभेत शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांची मोठी गर्दी होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीची मदत मिळावी यासाठी आपण वारंवार आंदोलने केली आहेत. एल्गार मोर्चानंतर मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनादरम्यान २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ यासह दुष्काळ, अवकाळी व गारपिटीची मदत यासह मागण्या आक्रमकपणे मांडल्या होत्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, अवकाळी व गारपिटीच्या मदतीसंदर्भात शब्द दिला होता व त्यासंदर्भातील सूतोवाचही त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकर्‍यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. ही मदत लवकर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली तर त्याचे श्रेय रविकांत तुपकर आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जाईल म्हणून ही मदत तातडीने जमा न करता आता निवडणुकीच्या तोंडावर जमा केली जात आहे, मात्र या मदतीसाठी आम्ही केलेली आंदोलने जनता विसरली नाही. त्यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नव्हते आणि आता श्रेय घेण्यासाठी काही जण पुढे येतील पण जनतेला सर्व समजते, आता कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी शेतकर्‍यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असा घणाघात यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी केला.
तातडीने मंजूर झालेली रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करा, त्याचबरोबर दुष्काळाची मदत व पीकविमाही तातडीने शेतकर्‍यांना द्या, तसेच सोयाबीन-कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनस द्या, अशी मागणी देखील रविकांत तुपकरांनी या मेळाव्यादरम्यान केली. याप्रसंगी मंचावर रिजवान सौदागर, गजानन लांडे-पाटील, अंकुशराव वाघ, तुळशिरामदादा काळे, डॉ.विनायक वाघ, आकाश माळोदे, प्रभूसेठ वाघ, राजेंद्र नागवे, सदाशिव जाधव, पुरुषोत्तम पालकर, तुळशीराव वाघ, विनायक वाघ, समाधान नागवे, प्रदीप टाकसाळ, दगडू साखरे, गणेश वाघ, अमोल देवकर, प्रकाश सपकाळ, डी.एन. सपकाळ, एकनाथ वाघ, वैभव वाघ, नेहरूसिंग मेहर, राजू धनावत, गोपाल राजपूत, संदीप वाघ, गुलाब जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर या मेळाव्याचे आयोजन समस्त सावळी गावकर्‍यांनी केले होते व या मेळाव्यासाठी हिंदूधर्मरक्षक ग्रुप सावळी व सुवर्ण गणेश मित्र मंडळाच्या युवकांनी प्रचंड मेहनत घेतली.

तुपकरांना जेल की बेल..? फैसला येणार आज २१ फेब्रु.ला!

आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकर यांना दिलेला जामीन रद्द करण्याबाबतचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. ७ व ८ फेब्रुवारी या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यानंतर १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत देखील या प्रकरणी दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल २१ फेब्रुवारी रोजी देणार आहे. तुपकरांना तुरुंगात जावे लागणार.? की त्यांना जमीन मिळणार..? याचा फैसला आज समोर होणार आहे. हा फसला येण्यापूर्वी रविकांत तुपकर सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहेत व त्यानंतर न्यायालयात हजर होणार आहेत आता नेमका याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!