Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

घाटाखालून पांडुरंगदादांनी केली लोकसभेसाठी दावेदारी; शरद पवारांनी दादांना बायोडाटा घेऊन पाठवले ‘मातोश्री’वर!

शेगाव (खास प्रतिनिधी) – बुलडाणा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घाटाघालून ४० वर्षापासून शेगावचे सहकार क्षेत्र ज्यांच्याकडे अबाधित आहे व जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहून गेलेले आहेत, अशा पांडुरंगदादा पाटील यांनी दावेदारी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून उमेदवारी मागण्यासाठी बायोडाटा घेऊन ते खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे गेले असता, पवारांनीच बुलढाण्याची जागा ठाकरे शिवसेनेकडे असल्यामुळे तुम्ही तुमचा बायोडाटा ‘मातोश्री’वर देऊन टाका, अशा सूचना दिल्या व पांडुरंगदादांनी त्यांचा बायोडाटा अर्जासह मातोश्रीवर दिल्याचे त्यांनीच सांगितले.

बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेचा इतिहास बघितला तर, बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही घाताखालचा उमेदवार कोणत्याही पक्षाने दिलेला नाही. पांडुरंगदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेपासून पक्षासोबत आहेत, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असता ते पवार साहेबांसोबतच राहिले. पांडुरंगदादा हे पूर्वी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते, परंतु त्यांनी डॉ. शिंगणे जरी अजितदादा सोबत गेले असलेतरी पवार साहेबांची साथ मात्र सोडली नाही. नुकतीच त्यांनी शरदचंद्र पवार यांना मुंबई येथे भेट घेऊन बुलढाणा लोकसभेसाठी दावा सादर केला. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ते राहिले असून, त्यांनी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव तालुका खरेदी विक्री संघ, शेगाव तालुक्यातील विविध सहकारी सोसायटी मागील अनेक वर्षापासून आपल्या सहकार पॅनलकडे कायम राखलेल्या आहेत. त्यामुळे पांडुरंगदादा पाटील यांना सहकार नेते म्हणून एक वेगळी ओळख लाभली आहे.
शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पांडुरंगदादा गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी काम केले. मात्र राज्यांमध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार गत काही महिन्यांपासून सत्ता पक्षात सहभागी झाल्याने आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे त्यांच्यासोबत गेले. मात्र पांडुरंगदादा पाटील यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरील आपली निष्ठा कायम ठेवली असून, आजही ते शरद पवार यांचेच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कायम आहेत. नुकतीच त्यांनी मुंबई येथे सिल्वरओक निवासस्थानी शरदचंद्र पवार साहेबांची भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाल्यास त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छासुद्धा आहे. शरदचंद्र पवार यांनी पांडुरंगदादा यांच्याशी चर्चा केली या चर्चेदरम्यान मी आपल्या गणेश पाटील परिवाराला बऱ्याच वर्षापासून ओळखतो. शेगावमधील गणेश पाटील घराणेविषयी मी बरेच ऐकलेले सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारीचा विचार भविष्यात केला जाईल, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडे असल्याने महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ त्यांच्याकडेच राहील असे वाटते. त्यामुळे आपण मातोश्रीवर जाऊन आपलं परिचय पत्र व निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या कार्यालयातसुद्धा अर्ज द्यावा, असेही त्यांनी सुचवले. त्यानुसार पांडुरंगदादा पाटील यांनी आपला अर्ज या दोन्ही ठिकाणी दिला.
सद्या शेगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये पांडुरंगदादा पाटील यांच्या सहकार पॅनल कडूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विरोधी पक्षाकडून एकही उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे या निवडणूकमध्ये सुद्धा पांडुरंगदादा पाटील यांच्या सहकार पॅनलचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाणार यात शंका नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तसेच गेल्या अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रावर घट्टपकड कायम ठेवून असलेले पांडुरंगदादा पाटील हे घाटाखलील एकमेव असे दमदार नेतृत्व असल्याने त्यांना उमेदवारी मिळाल्यास या लोकसभा निवडणूकीमध्ये ते रंगत आणून आपली करामत दाखवू शकतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!