– ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नता प्राप्त करा – प्रिया देशपांडे
छत्रपती संभाजीनगर – शहर व जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. ‘अमृत’ हा राज्य सरकारचा महत्वांकांक्षी प्रकल्प असून, या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, व आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन ‘अमृत’च्या प्रबंधक अधिकारी तथा जिल्हा पालक अधिकारी प्रिया देशपांडे यांनी येथे आयोजित लाभार्थी संवाद बैठकीदरम्यान केले. याप्रसंगी उद्योजक बनू इच्छिणार्या नारीशक्तीला त्यांनी उद्योजकतेचे वाणही देत, मकरसंक्रातीचे पर्व साधले. या संवाद बैठकीपूर्वी श्रीमती देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधत, लाभार्थ्यांना महसूल विभागाकडून विविध कागदपत्रे प्राप्त होण्यासंदर्भातील अडचणींबाबत अवगत केले. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना देत, ‘अमृत’ला सहकार्याची ग्वाही दिली.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी मेघा धस, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुनालोड या अधिकार्यांच्याही प्रिया देशपांडे यांनी भेटीगाठी घेऊन ‘अमृत’च्या लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली, तसेच सविस्तर पत्रही त्यांना सुपूर्द केले. मेघा धस यांनी शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाची भेट ‘अमृत’ कार्यालयास दिली. लाभार्थी संवाद बैठकीत प्रिया देशपांडे म्हणाल्या, की महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील, परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. ‘अमृत’च्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक येथे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, अर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याचबरोबर कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने, IIT/IIM व IIIT मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे, आदी योजना ‘अमृत’मार्फत राबविल्या जात आहेत, असे श्रीमती देशपांडे यांनी नमूद करून, विविध योजनांच्या सविस्तर माहिती, अर्ज दाखल करणे यासाठी ‘अमृत’चे संकेतस्थळ www.mahaamrut.org.in याला भेट देण्याचे आवाहन केले. या संकेतस्थळावर सर्व माहिती व फॉर्म दिलेले असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय आहे. ‘अमृत’च्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याचे आवाहन करत, लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनदेखील प्रिया देशपांडे यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी मकर संक्रातीचे पर्व साधत, प्रिया देशपांडे यांनी बैठकीला उपस्थित आणि नवउद्योजिका बनू इच्छिणार्या महिलांना हळदी-कुंकवाचे वाण देत, या छोटेखानी समारंभातून आपण सर्व नारीशक्तीने यशस्वी उद्योजकतेचे पर्व सुरू करावे, असे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी ‘अमृत’चे विभागीय समन्वयक दीपक जोशी, कन्नड तालुका समन्वयक रामेश्वर साळुंखे, जालना जिल्हा समन्वयक अक्षय लांबे, आदींसह सौ. अनुराधाताई पुराणिक सौ.सीमाताई रामदासी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या बैठकीस उपस्थिती दर्शवित ‘अमृत’च्या योजनांच्या प्रसारासाठी आपले योगदान देण्याची ग्वाही दिली. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांत ‘अमृत’च्या लाभार्थ्यांसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्याबाबत आश्वासित केले.
———