Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPoliticsVidharbhaWorld update

अ‍ॅड. शर्वरीताईंनी तुफान किल्ला लढविला; रविकांत तुपकर जेलमध्ये जाणार, की बाहेर थांबणार?; हे १५ तारखेला कळणार!

– देशाला स्वातंत्र्य हे आंदोलनातूनच मिळाले; रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांसाठी आंदोलन करतात; शेतकरी हेदेखील भारताचे नागरिकच; तुपकरांवर आंदोलनाचे गुन्हे; त्यांनी काही बलात्कार केले नाहीत, घरं फोडली नाहीत! – अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करा, व त्यांना स्थानबद्ध करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणार्‍या, तसेच कसेही करून तुपकरांना महिनाभर तरी जेलमध्ये डांबण्यासाठी इरेला पेटलेल्या बुलढाणा पोलिसांना शेतकर्‍यांची वाघिण अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी बुलढाणा अतिरिक्त सत्र न्यायालयात अतिशय कडवट अशी झुंज दिली. त्यांच्या घणाघाती युक्तिवादाने न्यायपीठाचे वातावरण गंभीर बनले होते. ‘शेतकरी हेदेखील देशाचे नागरिक आहेत, या देशाला स्वातंत्र्यदेखील आंदोलनातूनच मिळाले. रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांसाठी आंदोलने करतात, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आंदोलनात उदभवलेल्या परिस्थितीतून दाखल झालेले आहेत. पोलिस त्यांना सराईत गुन्हेगार म्हणत आहेत, परंतु त्यांनी शेतकरीहितासाठी आंदोलने केलीत. त्यांनी काही घरफोड्या केल्या नाहीत, बलात्कार केले नाहीत, किंवा भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्याची परवानगी पोलिसांना देऊ नये,’ असा जोरदार युक्तिवाद अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी करून पोलिसांच्या पुनरनिरीक्षण अर्जाला कडाडून विरोध केला. तब्बल दोन तांस दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर, आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवत, १५ तारखेला तो जाहीर करू, असे घोषित केले. त्यामुळे १५ तारखेला न्यायदेवता काय निर्णय देते? याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, ‘हे सरकार आपल्याला जेलमध्ये डांबण्यासाठी पेटून उठले आहे. जेलमध्ये गेलो तरी शेतकर्‍यांसाठी लढतच राहील. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे, न्यायालय जो निकाल देईल, तो आपल्याला मान्य असेल’, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले.

बुलढाणा पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत शेतकरी नेते रविकांत चंद्रदास तुपकर यांच्याविरोधात क्रिमिनल रिव्हिजन क्र.(फौजदारी पुनरनिरीक्षण अर्ज) ०७/२०२४ हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे दाखल केला आहे. सदर प्रकरण सध्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात सुरू आहे. या पुनरनिरीक्षण अर्जाद्वारे बुलढाणा पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पी. बी. देशपांडे यांनी इस्तेगाशा क्र. १/२४ वर दि.१९ जानेवारी २०२४ रोजी पारित केलेल्या आदेशास आव्हान दिले असून, हे आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, तुपकरांना विविध गुन्ह्यांत मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या अर्जाच्या अनुषंगाने तुपकर यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार, तुपकर हे न्यायालयात काल (दि.७) व आज (दि.८) न्यायाधीशांच्या समोर हजर झाले आहेत. काल कनिष्ठ न्यायालयाचे तुपकरांच्या संबंधित रेकॉर्ड न आल्याने या प्रकरणाची उर्वरित सुनावणी आज सकाळी ठेवण्यात आली होती. त्यानुसार, बुलढाणा पोलिसांच्यावतीने सरकारी वकील आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्यावतीने त्यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या जामीन रद्द करण्याच्या पोलिसांच्या अर्जावर १५ फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.
आजच्या युक्तिवादात पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी सांगितले, की रविकांत तुपकर हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच, जनमत प्रभावित होते. पोलिसांनी त्यांची केलेली अटक योग्यच असून, त्यांना स्थानबद्ध करणे गरजेचे आहे, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर, रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांसाठी लढतात, आणि शेतकरी हेदेखील या देशाचे नागरिक आहेत. तुपकरांनी काही दरोडे, घरफोड्या, भ्रष्टाचार, खून केले नाहीत. त्यांच्यावरील गुन्हे हे अनैतिक नाही तर शेतकरी आंदोलनातून उदभवलेल्या परिस्थितीतील आहेत, त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्याची मागणी चुकीची आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. शर्वरीताई तुपकरांनी केला आहे. दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर घणाघाती हल्ला चढविला. या सरकारला मला जेलमध्ये डांबायचे आहे. परंतु, आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय देईल तो निकाल मान्य असेल. जेलमध्ये गेलो तरी शेतकर्‍यांसाठी लढणे थांबविणार नाही, असे तुपकरांनी ठणकावून सांगितले.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!