– राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची ठाकरेंकडून चाचपणी, छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरेच लढणार!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनमत असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षण आले असल्याने महाआघाडीतील पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.८) बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह काही मतदारसंघाचा ‘मातोश्री’वर आढावा घेतला. यावेळी बुलढाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे नाव पुढे केले आहे. ठाकरे हे २२ व २२ तारखेला बुलढाणा जिल्हा दौर्यावर असून, त्या दौर्यात ते उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हेच शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत, असे जवळपास निश्चित झालेले आहे.
‘मातोश्री’वर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक आज पार पडली, या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करून संभाव्य उमेदवाराचे नाव जाणून घेतले. यावेळी सर्वांनी प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे नाव सूचविले. महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ फेब्रुवारीरोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी याबाबत घोषणा केली जाऊ शकते, असे मातोश्रीच्या सूत्राने सांगितले. बुलढाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत. सद्या जिल्ह्यातील जनमत त्यांच्या विरोधात गेलेले आहे. त्याचा अचूक फायदा घेण्यासाठी शिवसेना सरसावलेली आहे. बहुतांश पदाधिकार्यांनी सूचवलेले प्रा. नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख ते आता जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांनी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव, सिंदखेडराजा, मेहेकर, जळगाव जामोद हे विधानसभा क्षेत्र येतात. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीही बुलढाणा लोकसभेचा आढावा घेतला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी यापूर्वी झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांना दिला होता.
२३ जागांची ठाकरे गटाकडून मागणी, ११ जागा मिळण्याची शक्यता!
आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार आणि काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने ठरवलेले आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून ११ जागांवर नावे फायनल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामध्ये –
– शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
– बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
– ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
– रायगड – अनंत गीते
– रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
– दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
वायव्य मुंबई – अमोल किर्तीकर
– छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
– धाराशीव – ओमराजे निंबाळकर
– परभणी – संजय जाधव
– ठाणे – राजन विचारे
देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता देणार, याबाबत अंदाज घेण्यासाठी इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचे चित्र काय असेल, याची आकडेवारी समोर आली आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास राज्यात महाविकास आघाडी ही भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावर भारी पडणार असल्याचे दिलासादायक चित्र सर्व्हेतून पुढे आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा मिळतील. ज्यात काँग्रेसला १२, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप आघाडीला २२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांत केलेली फोडाफोडी व राजकारणाचा घसरलेला स्तर याबद्दल राज्यातील जनमत सत्ताधारीवर्गाविरोधत गेलेले आहे.
———–