देऊळगावराजा तालुक्यातील रोपलागवड योजनेतील गैरप्रकाराची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल!
– वन विभागात खळबळ; सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केली होती तक्रार!
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे/राजेंद्र डोईफोडे) – डोईफोडेवाडी, निमगाव गुरूसह इतर गावांतील वनविभागातील गैरप्रकारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी सचिवांना या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडसह इतर प्रकरणांत आर्थिक गैरप्रकार करणार्या अधिकार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सविस्तर असे, की देऊळगावराजा तालुक्यातील डोईफोडेवाडी, निमगाव गुरू, पांगरी १ व २, गिरोली ३, महादेव मंदिर परिसर येथील गट लागवड नावीन्यपूर्ण योजनेत झालेल्या प्रशासकीय अनियमिततेची स्वतंत्र चौकशी समितीकडून चौकशी करून सर्व कामांची तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार चौकशी व्हावी, कर्तव्यात कसूर करणार्या वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिनांक १५ जानेवारीरोजी दिले होते. या अनुषंगाने वनमंत्री यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन प्रधान सचिव यांना तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची आदेश दिले आहेत. खरात यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद होते, की २०२१ ते आजपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनपाल सामाजिक वनीकरण विभाग देऊळगावराजा यांनी विविध प्रजातीचे झाडे लागवड ही कागदोपत्री सादर करून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. तसेच लागवड करण्यात आलेल्या झाडाचे संगोपणासाठी शासनाकडून प्राप्त निधीमध्ये टँकर प्रक्रिया माध्यमाद्वारे आर्थिक भ्रष्टाचार केला असून, जवळपास ७० टक्के झाडे नष्ट झाले आहेत. रोपाची टक्केवारी, पाण्यावर टँकरद्वारे येणारा प्रत्यक्ष खर्च, तसेच झाडांना पाणी देणे तर सोडाच, लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या सभोवतालचा केर कचरासुद्धा कापण्यात आला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, लागवडीकरिता खोदण्यात आलेल्या अनेक खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेले नसतानासुद्धा लाखो रुपयांची बिले काढण्यात आली असून, या आर्थिक गैरव्यहारप्रकरणी संबंधित अधिकार्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करणे आवश्यक आहे. तापमानवाढ घटविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये हरित करणे तसेच भागातील नागरिकांना लाकूड फाटा इंधन फळाचे औषध वनस्पती व गुराच्या चार्यांची गरज भागवण्यासाठी व ग्रामीण भागामध्ये शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोपवाटिका तयार करणे व वृक्ष लागवड करणे या शासनाच्या ध्येय धोरणास बाधा निर्माण केली आहे.
सर्वात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे डोईफोडेवाडी येथे कागदोपत्री दाखवलेली झाडे नष्ट करण्यात आली असून, तसेच आग आटोक्यात आणण्याच्या प्रक्रिया तपासणी केल्यास त्यांचा सहभाग असल्याचे चौकशी समितीच्या पाहणीमध्ये चौकशी प्रशासकीय कामात अहवालात जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले आहे. कर्तव्य पालनात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित अधिकार्याविरुद्ध सन २००४ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ दिनांक १५ /१२ /२००६ चे प्रकरण ३ च्या अन्वये दप्तर दिरंगाई कायदा २००६ च्या कलम १० चे १,२,३ नुसार संबंधित अधिकारीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री तसेच प्रशासनाचे प्रधान सचिवांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संबधित अधिकारी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, लोकआयुक्त, मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात दाद मागावी लागेल. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री व प्रधान सचिव यांना केली असता, सदर निवेदनावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ सचिवाला आदेश देऊन या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.