– ग्रामस्थांसह तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या भेटी; बालगोपाळांचे केले कौतुक!
चिखली (कैलास आंधळे) – देशभरात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असल्याने रामदिवाळी साजरी होत असताना, मेरा बुद्रूक येथील फाटा वस्तीवरील हनुमान मंदिरात गावातील बालगोपाळांनी स्वखर्चाने दीपोत्सव करून हा आनंद द्विगुणीत केला. या सर्व बालगोपालांचे सर्वांनी कौतुक केले आहे.
चिखली तालुक्यातील १४ ते १५ हजार लोकसंख्येचे गाव असलेले मेरा बुद्रूक येथे मेरा फाटा वस्तीवरील हनुमान मंदिरात ८ ते १२ वयोगटातील मुलांनी कोणाकडून कोणतीही वर्गणी न घेता, आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेल्या पैशाची बचत करून हनुमान मंदिरात दीपोत्सव व भगवे झेंडे त्या पैशातून लावून रात्रीच्या वेळेस उत्स्फूर्त दीपोत्सव साजरा केला. मंदिरावरील झगमगाट पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गजाननभाऊ वायाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, ग्रामपंचायत सदस्य पती खुशालराव पडघान, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पडघान, आदींनी मंदिरस्थळी जाऊन या मुलांचा उत्साह वाढविला व हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच, या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. इतक्या लहान वयामध्ये स्वतःच्या धर्माबद्दल व संस्कृती टिकून राहण्याबद्दल नवतरुणाई समोर येत असल्याचे चांगले उदाहरण मेरा बुद्रुक फाटा वस्तीवर दिसून आले.
विशेष बाब अशी, की मेरा बुद्रूक येथे एक-दोन वर्षापूर्वी प्रभू श्रीरामांचे मंदीर झालेले आहे. ज्या व्यक्तीने हे राममंदीर उभारले आहे, त्यांचे नुकतेच निधन झाल्याने त्या घरावर सुतक असल्याने देशभरात रामदिवाळी साजरी होत असताना हे मंदीर मात्र सुनेसुने होते. सुतक असलेल्या या कुटुंबातील कुणी व्यक्ती तर या मंदिराकडे गेला नाही, पण गावकर्यांनीदेखील या मंदिराकडे पाठ फिरविल्याने सुज्ञ नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती.
———-