बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लाखो रूपयांच्या रोख रकमेसह उचलून चोरून नेल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील संग्रामपूर येथे ही धक्कादायक घटना घडली. परंतु, जालना जिल्ह्यात या चोरट्यांना जालना पोलिसांनी पकडल्याने एटीएमसह सर्व रक्कम सुरक्षीत परत मिळाली आहे. या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
रविवारी पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान ही अफलातून चोरी झाली. टोळीने मोठी रक्कम असलेले एटीएम उखडून सोबत आणलेल्या चारचाकी मालवाहू वाहनात टाकले. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांच्या सुसज्ज टोळीने चक्क एटीएम मशीन हे त्यातील लाखोंच्या रक्कमेसह उचलून नेल्याच्या घटनेने संग्रामपूरमध्ये एकच खळबळ उडाली. गस्तीवरील पोलिसांना एटीएम चोरीस गेल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ठाणेदरांना कळवले व ठाणेदार यांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तसेच जालना, अकोला, जळगाव आदी सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकार्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. जालना पोलिसांना एटीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक आढळून आल्यानंतर त्यांनी हा ट्रक व आरोपी ताब्यात घेतले. जालना पोलिसांनी दोघा आरोपींना एटीएम व मालवाहू वाहनासह पकडले, याची माहिती मिळताच जालना येथे विशेष पथक रवाना करण्यात आले. पथकात पोलीसांसह स्टेट बँकेचे संग्रामपूर शाखा व्यवस्थापक, एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.
———–