नरूभाऊंची उमेदवारी धोक्यात!; ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण मैदानात?
– केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांच्या पाचव्यांदा दौर्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली?
– आशीष रहाटे, की प्रा. नरेंद्र खेडेकर, की रविकांत तुपकर; शिवसेना नेतृत्वापुढे पेच?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभेची निवडणूक अवघी महिना-दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेच्या दोन्ही गटांत सामसूम शांतता आहे. याचे कारण म्हणजे, शिवसेनेच्या दोन्ही नेतृत्वाने आपले उमेदवार अद्याप निश्चित केलेले नाही. शिवसेना (ठाकरे) गटाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र असताना आता शिवसेनेने अधिकृत प्रेसनोट काढून, विदर्भात कुणाचीच उमेदवारी फायनल नाही, कुणीही उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करू नये, असे ठणकावले आहे. त्यामुळे प्रा. खेडेकर यांची संभाव्य उमेदवारी धोक्यात आहे. दुसरीकडे, बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे उघड असून, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाचव्यांदा या मतदारसंघाचा दौरा करून राजकीय आढावा घेतला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनदेखील अद्याप प्रतापरावांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे कोणताच नेता तयारीला लागलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे काही नावे गेली असल्याची खात्रीशीर माहिती असून, त्यात आशीष रहाटे, प्रा. खेडेकर यांची नावे पक्षातून, तर शिंदे किंवा भाजपचा उमेदवार पाडायचा असेल तर मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, अशी माहिती ‘मातोश्री’वर पोहोचली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
लोकसभेच्या उमेदवारीवरून विदर्भात विविध नेते दावे करत असल्याने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी प्रेसनोट जारी केली आहे. त्यात विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित केले गेलेले नसून, सर्व पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा करून, उमेदवारांची नावे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुमतीने ही नावे जाहीर केली जातील, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले आहे. आपली उमेदवारी निश्चित झाली असे सांगून, कुणीही संभ्रम निर्माण करू नये, असेही खा. राऊत यांनी संबंधितांना ठणकावले आहे.शिवसेनेच्या या भूमिकेमुळे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटातून कानावर येत आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने किंवा भाजपने बुलढाणा लोकसभेच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र प्रतापराव जाधव यांचा पत्ता कट करण्याला शिंदे गटातून तीव्र विरोध आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर याबाबत अत्यंत स्पष्ट व आक्रमकपणे आपली बाजू मांडलेली आहे. खा. जाधव नसतील तर आपण लोकसभा निवडणूक लढवू, असे त्यांनी जाहीर करून भाजपची चांगलीच राजकीय कोंडी केली आहे. भाजपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हवा असल्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा असून, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे तब्बल पाचव्यांदा बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे त्यांचे व भाजप नेत्यांच्या दौर्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मध्यंतरी, राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये भाजपने सर्वेक्षण करून घेतले होते. त्यात बुलढाणा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळतील, असे या सर्वेक्षणात भाजपला आढळले होते. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा केला असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिली होते. त्यामुळेच काल व आज भूपेंद्र यादव हे जिल्हा दौर्यावर असताना भाजप व अजित पवार गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली, परंतु शिंदे गट किंवा स्वतः खासदार प्रतापराव पवार हे केंद्रीय मंत्री यादवांच्या दौर्यात कुठे दिसले नाहीत.
लोकसभेची उमेदवारी ठरविण्याच्या निर्णायक वेळेवर मंत्री यादव हे जिल्ह्यात पाचव्यांदा येऊन गेल्याने शिंदे गटाची धाकधूक वाढलेली आहे. शिंदे गट किंवा भाजपच्यावतीने खासदार प्रतापराव जाधव यांना अद्याप जाहीररित्या उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतापरावांसारख्या मुरब्बी नेत्यावरचे राजकीय दडपण चांगलेच वाढलेले आहे. दुसरीकडे, प्रतापरावांनी उद्धव ठाकरे यांना दुखावलेले असल्याने त्यांचे परतीचे दोरही कापलेले गेलेले आहेत. शिंदे गटाचा काय निर्णय होतो, ते पाहून ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार असल्याने, भाजप व शिंदे गटाचा उमेदवार पाडण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच उद्धव ठाकरे हे लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठस्तरीय वर्तुळातून सांगण्यात आलेले आहे. त्यात एकवेळेस शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार राहू शकतात, किंवा शिवसेना त्यांना पाठिंबा जाहीर करू शकते, असेही सूत्राचे म्हणणे आहे.
—————–