जळगाव जामोद (संजय निकाळजे) – पत्रकारांनी अगोदर आपले घर, प्रपंच सांभाळून पत्रकारिता केली पाहिजेत. आपल्या लिखाणामध्ये आपले शब्द लिहिताना ते त्या व्यक्तीला बोचले तरी चालतील, मात्र त्याच्या वेदना त्याला व्हायला नको. आणि त्यामुळे त्याचे आयुष्य बरबाद होईल, याची दक्षता सुद्धा घेतली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि जळगाव जामोदचे आ. संजय कुटे यांनी केले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे पार पडले. यावेळी ते प्रथम सत्राच्या उद्घाटनापर मार्गदर्शनात बोलत होते.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदु जोशी, विशेष उपस्थिती म्हणून आय एन एस समितीचे कार्यकारी सदस्य तथा दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य तथा दैनिक वृत्त केसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा, अमरावती विभागीय समितीचे अध्यक्ष रवींद्र लाकोडे, संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधीक्षकृती समिती सदस्य सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सावळे , केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेशाध्यक्ष जयश्री पंडागळे , केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत संजय तल्हार यांनी सादर केले, तर प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी केले. यानंतर यदू जोशी, विलास मराठे, रवींद्र लाकोडे, मनोहर सुने यांनी मनोगत व्यक्त केले. तर दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्षस्थानी संपादक श्रीकृष्ण चांडक होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदीप वाकेकर, राजर्षी शाहू परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके, मीना राहीज, वर्षा घाडगे , भावना सरनाईक आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित उपरोक्त मान्यवरांसह माधुरी शर्मा, रवींद्र तीराणिक यांच्यासह इतर पत्रकारांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन अनिल भगत व कांचन मुर्के यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी केले.
यावेळी अधिवेशनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया करिता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे, तालुकास्तरावर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्यात यावे, पत्रकारांच्या शिबिर व कार्यशाळा करिता अनुदान देण्यात यावे, ग्रामीण व शहरी पत्रकारांसाठी म्हाडामार्फत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या हमीसह विमा योजना शासनाने लागू करावी, पत्रकारांना (पाच वर्षे सेवा पूर्ण झालेले) मानधन लागू करण्यात यावे, व साठ वर्षानंतर पेन्शन योजनाचा लाभ द्यावा, विनापरवानगी द्वेष भावनेतून ग्रामीण व शहरी पत्रकारावर न्यायालयीन खटले अथवा पोलीस कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा नोंद करण्यात येऊ नये, पत्रकारांना वृत्त संकलनाच्या कामाकरिता एसटी व रेल्वेमध्ये विनाअट सवलत मिळावी, यासह विविध २३ ठराव या अधिवेशनात मांडून त्याची प्रत शासनाकडे पाठविण्यात आली. या अधिवेशनासाठी जिल्हा तालुका कार्यकारणीसह इतर कार्यकारिणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. अधिवेशनात राज्यभरातून पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.