ChikhaliVidharbha

शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; मुले शाळेतून परत नेली!

– गटशिक्षणाधिकारी यांची कोलारा शाळेवर धाव!

बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) – चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कोलारा येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेवर शिक्षिका असलेल्या कावेरी वाकोडे यांची भोकर येथील शाळेवर बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना कोलारा शाळेवर कायम ठेवण्यात यावे, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही. असा पवित्रा पालकांनी घेतला. हा प्रकार चिखली पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांना माहीत होतास त्यांनी कोलारा शाळेवर धाव घेऊन पालकांची समजूत काढली. यावेळी पालकांनी पालकांनी त्यांना निवेदन दिले.

जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा कोलारा येथील शाळेवर वाकोडे मॅडम ह्या गेल्या अनेक वर्षापासून अध्यापनाचे कार्य पार पडतात. मागील महिन्यामध्ये त्यांची पदोन्नतीवर भोकर येथील शाळेवर बदली झाली .मात्र पालकांनी वाकोडे मॅडम यांना कोलारा येथील शाळेवर परत पाठविण्यात यावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांची भेट घेऊन मागणी केली . यावेळी महाले यांनी शिक्षण अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून ही बाब सांगितली व कोलारा येथील शाळेवर सध्या असलेले मुख्याध्यापक बळी सर यांची देखील पालकांनी भेट घेऊन हा प्रकार सांगितला असता, त्यांनी मी येथून जाण्यास तयार आहे, असे सांगितले होते. मात्र यासाठी एक महिना उलटून गेला तरी वाकोडे मॅडम यांची कोलारा शाळेवर बदली न झाल्यामुळे परवा सर्व पालक सकाळी शाळेवर जमा झाले व जोपर्यंत वाकोडे मॅडम यांना कोलारा येथील शाळेवर रुजू करण्यात येणार नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा पवित्रा घेतला, व मुलांना शाळेत न ठेवता पालक मुलांना घरी घेऊन गेले.
हा सर्व प्रकार चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना माहीत होताच त्यांनी तात्काळ कोलारा शाळा गाठली व पालकांची समजूत काढली. यावेळी पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन वाकोडे मॅडम यांना तात्काळ कोलारा शाळेवर रुजू करण्याची मागणी केली. जर त्यांना लवकरात लवकर येथील शाळेवर बदली न दिल्यास मुलांचे दाखले सुद्धा शाळेतून काढण्यात येतील, असा इशारा दिला .शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर रेखा ब्राह्मणे, गजानन सोळंकी, परमेश्वर सोळंकी, डॉ विठ्ठल सोळंकी, सिद्धेश्वर गवळी, लक्ष्मी ठाकरे, माया खंडारे, निरू सोळंकी, अश्विनी सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, सरला सोळंकी, जिजा सोळंकी, गीता हरणे, गणेश जैन, विनोद माघाडे, अमोल सोळंकी, सुनील सोळंकी, पांडुरंग पवार, रमेश सोळंकी, संदीप सोळंकी, राजेश सोळंकी, रवींद्र अक्कर, विलास सोळंकी, परमेश्वर सोळंकी, सिद्धेश्वर सपकाळ, सुरेश सोळंकी, ईश्वर गवले, अनिता पवार, दुर्गा सोळंकी यांच्यासह पालकांच्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!