नवापूर जि. नंदूरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळ अतिवृष्टीमुळे सरपणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने महामार्ग बंद झाला आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनी अभियंता व कर्मचारीकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पर्यायी रस्त्यावर पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाच्या पाण्याने व महामार्गावर वाहनचालकांनी वाहतूक व्यवस्था वळविल्यास वाहनाचा कोणताही अडथळा निर्माण झाला नाही तर रस्त्यावरील पर्यायी पुलाचे काम युद्ध पातळीवर करून दुरुस्ती लवकरच पूर्ण करून पुन्हा महामार्ग पुर्ववत सुरळीत सुरू होईल असे माहीती संबंधित ठेकेदार कंपनीचे मॅनेजर राजेश म्हात्रे यांनी दिली आहे. परिसरातील खेडेगावातील शेतकरी बांधवांना बाजारपेठेत येण्यासाठी दुचाकी स्वार व लहान गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या पुलावरून जाऊ दिले जात आहे. मात्र अपघात होऊ नये यासाठी मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाचे नवापूर तालुक्यात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विसरवाडी सरपणी नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल नदी मधून तयार केला होता. परंतु सरपणी नदीला आलेल्या महापुरामुळे कच्चा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनीही वाहतूक पूर्ववत व्हावी यासाठी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहन चालकांना रस्ता सुरू झाल्याची चुकीची माहिती मिळाल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली आहे. महामार्ग कधी सुरू होईल याकडे वाहनचालक टक लावून बसले आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरामुळे दुरुस्तीसाठी मोठी अडचण येऊन जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.(ता.प्र)