नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथील घाटात तीन ते चार ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्ता खचला आहे.त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी आहे.
10 जुलैपासून सातपुडा पर्वत रांगेत संततधार पाऊस झाला व अद्यापही पावसाची हजेरी सुरूच आहे.मुसळधार पावसामुळे घाटात पाण्याच्या वेगवान प्रवाह असल्याने ठिकाणी रस्ता खचून गेला आहे. अक्षरशा मोठ मोठे खड्डे पडून मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही ठिकाणी रस्ता खचल्याने दोन वाहने पास करणे कठीण जात असल्याने वाहने काढण्यासाठी रहदारी थांबवावी लागते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एखाद्यावेळेस बाजूस खोल दरीत वाहने पडण्याची शक्यता आहे.म्हणून म्हसावद पोलीसांनी ठिक ठिकाणी बॅरिकेट्स लावून फलक लावण्याची मागणी आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन खचलेला रस्ता दुरुस्त करावा.राणीपूर ते तोरणमाळ पर्यंत असा एकूण बावीस किलोमीटरचा घाट आहे.
सात पायरी घाटातील नागार्जुन जवळ पावसामुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठा ढीग साचला आहे.प्रशासनाने तोरणमाळ कडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे.(जि.प्र)