चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील आदर्शगाव मिसाळवाडीचे सुपुत्र तथा मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ यांची स्वराज्य शिक्षक संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिक्षक संघाच्या झालेल्या ऑनलाईन मिटिंगमध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली. संघाचे अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके आदींनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. शिवश्री मिसाळ यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी पुढील काळात आवाज उठवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावाने अनेक चांगले व्यक्तिमत्व राज्याला दिले आहे. या गावाचे भूमिपुत्र प्रशासन, पत्रकारिता, उद्योग, शिक्षण व सिनेमाक्षेत्रात आपला लौकिक निर्माण करून गावाची सर्वदूर ओळख निर्माण केली आहे. मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ यांनीदेखील शिक्षणक्षेत्रात आपली अनोखी ओळख निर्माण केली असून, त्यांनी अनेक गोरगरीब मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आहे. अंशकालीन तसेच कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात. शिक्षकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या प्रवीण मिसाळ यांची नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत सर्वानुमते बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीतच स्वराज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, महासचिव शंकर शेरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, गिरीश मखमले यांनी शिवश्री प्रवीण मिसाळ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. त्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल ब्रेकिंग महाराष्ट्र बिझनेस ग्रूपचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, उद्योजक बळीराम मिसाळ, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणार – शिवश्री प्रवीण मिसाळ
शिक्षकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी रखडलेल्या आहेत. त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिक्षकांचा आवाज बुलंद करणार असून, त्यासाठी आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण मिसाळ यांनी दिली आहे.
—————