चिखली (महेंद्र हिवाळे) – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची मारेकर्यांनी राजस्थानातील जयपूर येथे गोळी घालून हत्या केल्याने देशभरातील राजपूत समाज संतप्त झाला असून, त्याचे तीव्र पडसाद चिखली येथेदेखील उमटत आहेत. गोगामेडी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राजपूत समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला, तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दोनच दिवसांपूर्वी जयपूर येथे सुखदेवसिंह गोगामेडी यांच्यावर मारेकर्यांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली असून, राजस्थान पोलिस कसून तपास करत आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ राजपूत समाजाच्यावतीने आज (दि.८) दुपारी चिखली शहरात मूकमोर्चा काढण्यात आला. तसेच, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मारेकर्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवदास राजपूत, किशोर सोलंकी, अनिलसिंह चौहान, सागर इंगळे यांच्यासह बहुसंख्य राजपूत समाजबांधव उपस्थित होते. यापूर्वी हत्याकांडाच्या दुसर्या दिवशी ६ तारखेलादेखील राजपूत समाज बांधवांनी या हत्याकांडाचा निषेध केला होता. आजच्या मोर्चात राजपूत समाजासह इतर हिंदू समाजदेखील सहभागी झाला होता.
———-