फडणवीस शब्दाला जागले, तुपकरांना दिलेला शब्द पाळला; पीक नुकसानीच्या अंतरिम भरपाईनंतर आता केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी आजच बैठक!
– रविकांत तुपकरांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैठकीचे निमंत्रण, तब्येतीचीही केली चौकशी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत आठ दिवसात केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक लावू, असा शेतकरी नेते रविकांत तुपकरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अखेर पाळला असून, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत शनिवारी (दि.9) रात्री मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शासनाच्यावतीने रविकांत तुपकर यांना रितसर निमंत्रित करण्यात आले आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविकांत तुपकरांना फोन करून बैठकीबाबत कळविले, तसेच त्यांच्या तब्येतीबाबतही आस्थेवाईकपणे चौकशी केली. तुपकरांबाबत फडणवीस हे कमालीचे संवेदनशील असून, सत्ताधारी पक्षातील एका गटाचा तीव्र विरोध झुगारून ते तुपकरांशी चर्चा करत आहेत, तसेच शेतकरीहिताच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत. तुपकरांच्या मागणीनुसार, पीक नुकसानीची अंतिरम भरपाई शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली असून, दुष्काळाची मदतदेखील लवकरच जमा केली जाणार आहे. तसेच, सोयाबीन व कापसाच्या दरवाढीबाबतही केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला नऊ हजार तर कापसाला १२,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, यासह शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी २९ नोव्हेंबररोजी हजारो शेतकर्यांसह मुंबईत धडक दिली होती. शेतकर्यांचे हे वादळ पाहता अखेर सरकारने तुपकरांना चर्चेचे निमंत्रण दिले आणि त्यानुसार तुपकरांसह एकूण २२ जणांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चर्चेसाठी पोहचले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी तुपकरांनी आपल्या सर्व मांगण्या मांडल्या. दोन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असून, पंधरा दिवसांत या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही तुपकरांना दिली. तर सोयाबीन-कापूस दरवाढ प्रश्नाबाबत येत्या आठ दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत बैठक घडून आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार शनिवारी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत मुंबईत सोयाबीन- कापूस प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना या बैठकीबाबत कळविले आहे. तुपकर सोयाबीन-कापूस उत्पादकांची बाजू या बैठकीत लावून धरणार आहे. सोयापेंडीची आयात थांबवून निर्यात करावी, खाद्यतेलावरील आयातशुल्क ३० टक्के करावा, कापूस व सुत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, तेलबियांवरील जीएसटी रद्द करावा, जीएम सोयाबीन व कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळावी, सोयाबीन-कापसाची वायदे बाजावरील बंदी उठवा, यासह केंद्र शासनाशी संबंधित असलेल्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.
बुलढाणा येथील ‘बुलढाणा लाईव्ह’ या न्यूज पोर्टलचे संपादक कृष्णा सपकाळ यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घेतलेली बेधडक मुलाखत खास ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वाचकांसाठी येथे पुनर्प्रसारित करत आहोत. अवश्य पहावी.
उद्या होणारी बैठक आजच…
शनिवार दि.09 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. सह्याद्री अतिथीगृहावर होणार बैठक…
सोयाबीन-कापूस प्रश्नी, नुकसान भरपाई, पीकविमा, दुष्काळ यासह अन्य मुद्दांवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली. एल्गार रथयात्रा, त्यानंतर रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा,अन्नत्याग आंदोलन,आणि मुंबईत जाऊन घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकार नरमले व तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर सरकारने विस्तृत चर्चा केली. या बैठकीत सरकारने बहुतांशी मागण्या मान्य करत देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा शब्द तुपकर व शेतकऱ्यांना दिला होता. विशेष म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना या केंद्र सरकार सोबतच्या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे समजते. शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी दि.09 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोयाबीन-कापूस प्रश्नी वाणिज्यमंत्री मंत्री पियुष गोयल यांचेसोबत ना.फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयत-निर्यात धोरणात काय बदल केले पाहिजे, या अनुषंगाने रविकांत तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत…या बैठकीत काय होते त्यानंतर रविकांत तुपकर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील.. अशी सूत्रांची माहिती आहे.