आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीतही भाविकांनी एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यास गर्दी केली. तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने केली होती. एकादशी दिनी हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेत श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात पूर्ण केली. यावेळी परंपरेने श्रींचे मानकरी, भाविक उपस्थित होते. मानकरी याना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
इंद्रायणी नदीवर स्नान करण्यास भाविकांची दिवसभर गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासले. अनेक भाविकांनी संध्याकाळी दीप दान केले. येथील इंद्रायणी महाआरती सेवा समितीचे वतीने आयोजित दैनंदिन इंद्रायणी महाआरती उत्साहात झाली. यावेळी इंद्रायणी महाआरती सेवा समितीचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, खजिनदार भोलापुरीजी महाराज, माऊली घुंडरे, रोहिदास कदम, दिनकर तांबे, माऊलीचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत परंपरेचे धार्मिक कार्यक्रम झाल्याचे असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर वारकरी, भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. मंदिरात भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनबारी भक्तीमय वातावरणात फुलली. मंदिरात परंपरेने प्रसाद वाटप उत्साहात झाले. यासाठी सेवक, सुरक्षेसाठी पोलीस, सुरक्षा रक्षक यांनी सुव्यवस्थेसाठी परिश्रम घेतले.