17 वर्षाचं पोरगं राक्षस झालं; अडिच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून डोक्यात दगड घातला!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चॉकलेटचे आमिष दाखवून अवघ्या अडिच वर्षीय बलिकेवर क्रूरपद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना तरवाडी (तालुका नांदुरा) येथे घडली. यावेळी नराधमाने तिच्यावर दगड टाकून ठार मारण्याचा प्रयत्नही केला. पीडित बालिकेला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी हा १७ वर्षीय असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून नराधमावर बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.
सविस्तर असे, की नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे काल, गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष दाखवून अडिच वर्षीय बालिकेवर १७ वर्षीय मुलाने क्रूर पद्धतीने लैंगिक अत्याचार केला. कूकर्म करून बालिकेला डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्नही केल्याने ती गंभीर जखमी झाली. या आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बालिका बेशुद्ध झाली, मात्र तिला मृत समजून आरोपीने पलायन केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला. त्याने घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते पथकासह गावात दाखल झाले. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बालिकेची तब्येत गंभीर आहे. या बालिकेला अकोला येथील रुग्णाल्यात भरती करण्यात आले असून, अल्पवयीन आरोपीला बोरखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.