– मोठमोठ्या फांद्यांनी मार्गावरील नामफलकदेखील झाकले!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली ते बुलढाणा या मार्गावरील मोठमोठ्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या असून, त्यामुळे एखाद्या जीवघेण्या अपघाताची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र नेहमीप्रमाणे झोपेत असून, त्यांना या फांद्यांमुळे एखाद्यांचा जीव जाण्याची प्रतीक्षा दिसते आहे. रस्त्यांवर वाकलेल्या फांद्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवकाळी पावसात, सोसाट्याच्या वार्यामुळे सदर झाडाच्या फांद्या रोडवरील वाहनावर पडून कित्येक वाहनचालकांना अपघातग्रस्त व्हावे लागले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष सुरू आहे.
चिखली ते बुलढाणा रस्त्यावरील हातणी गावानजीक बाबळीच्या झाडाची फांदी काही दिवसांपूर्वीच कंटेनरला घासल्यामुळे अर्धवट स्थितीत वाकून रस्त्याच्या मधोमध लटकलेली होती. सुदेवाने ती फांदी रस्त्यावरील वाहनावर किंवा रस्त्यावरील येणार्या जाणार्या हातणी येथील नागरिकांच्या अंगावर पडली नाही, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करून चिखली ते बुलढाणा मार्गावरील सर्व झाडांच्या फांद्या तोडून रोडवरील वाहनचालक तसेच गावातील नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा चिखली-बुलढाणा मार्गावरील वाहनचालक तसेच हातणी येथील ग्रामस्थांकडून दिला जात आहे. चिखली-बुलढाणा मार्गावरून शासनाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी, कर्मचारी प्रवास करतात. परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाहीत. अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
—————-