राष्ट्रवादीच्या मावळ्यांनी नामदेवरावांचे तोंड काळे केले; बेदम चोपही दिला!
– राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वीकारली घटनेची जबाबदारी!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – आपल्या वक्तव्यांनी नेहमी वादग्रस्त राहणारे लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांचे तोंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काळे फासून काळे केले आहे. नामदेवरावांचे तोंड काळे करण्याचा प्रकार शहरातील पत्रकार भवन येथे घडला. प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्यात ही घटना वैâद झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी या शाईफेक आणि तोंडाला काळे फासल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. नामदेवराव हे राजमाता जिजाऊंचे वंशज सांगत असतात, पण त्याला सिंदखेडराजातील राजे जाधव कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल प्रा. नामदेवराव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीसाठी खटाटोप करत होते. त्यांच्या दिवसेंदिवस वाढलेल्या वाचाळपणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले व एकदाचे त्यांचे तोंड काळे केले. नामदेवराव यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम होता. मात्र, डेक्कन पोलिसांनी त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कारण, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. तसेच, त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही दिला होता. यानंतर भांडारकर संस्थेने कुठलाही अनुचित प्रकार घडून नये, म्हणून नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द केला. अशात नवी पेठ येथे पत्रकार भवनाबाहेर नामदेवराव जाधव हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नामदेवरावांचे तोंड काळे करून त्यांना काळे फासले, तसेच चांगलाच चोपही दिला. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा अजब दावा नामदेवरावांनी केला होता. तो दावा खोटा असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टही केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते.
नामदेवराव जाधव हे पत्रकार भवन येथे कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माहिती देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते येऊन त्यांच्या तोंडाला अचानक काळे फासले. तसेच, अचानक त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना चांगलाच चोपही दिला. हा सगळा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्यासमोर घडला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत नामदेवराव जाधव यांना पूर्ण घेराव घालत गाडीत बसून त्यांना तात्काळ घटनास्थळावरून रवाना केले व डेक्कन पोलिस ठाण्यात घेऊन गेले. याप्रसंगी नामदेवराव हे चांगलेच भेदरलेले दिसून आले.
प्रशांत जगतापांनी स्वीकारली घटनेची जबाबदारी!
महाराष्ट्रात मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारमधील कुणीतरी उच्चपदस्थ पवार साहेबांचे नाव घेऊन मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नामदेवराव जाधव यांचा वापर केला जात आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनला नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंद आहे. नामदेवराव जाधव हा शरद पवार यांच्याबद्दल पुरावा नसताना टीका करत होता, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली. आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे जगताप म्हणाले.