बुलढाणा (संजय निकाळजे) – साकेगाव येथील युवक टाईल्स व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या अंगी कौशल्य आहे. ही चांगली गोष्ट आहे. इथल्या युवकांनी मोरबी (गुजरात) च्या धर्तीवर स्वतःची टाईल्स फॅक्टरी सुरु करावी. त्याकरिता आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य, पाठबळ देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी दिली.
चिखली तालुक्यातील साकेगाव येथे वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी सभापती प्रकाश निकाळजे, दिलीप पाटील, रामू परिहार, सरपंच उर्मिला पवार, उपसरपंच देविदास लोखंडे, माजी सरपंच अंबादास इंगळे, संजय निकाळजे, जितू निकाळजे, शोभा क्षीरसागर , मग्गुल बी, कविता परिहार, किरण लोखंडे, शुभम तायडे , तंटामुक्ती अध्यक्ष दरबारसिंग परिहार, पोलीस पाटील सुनील निकाळजे, कैलास धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, चिखली येथे एमआयडीसी आहे. मात्र तिथे मोठ्या कंपन्या नाहीत. उद्योजकांनी गोडाऊन उभारले आहेत. एमआयडीसीमध्ये चांगल्या उत्पादक कंपन्यांनी उद्योग उभारल्यास या भागातील युवकांच्या हाताला रोजगार मिळेल. युवकांची भरभराट होईल. युवक हा उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे. युवकांनी सकारात्मक कार्यासाठी आपली शक्ती वापरावी. आपली प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित नागरिकांशी संवाद साधत वन बुलढाणा मिशन लोकचळवळ नेमकी काय आहे? यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली. सभेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. सभेला सुनील लहाने, गोलू निकाळजे, प्रदीप निकाळजे , दीपक वाकोडे, शुभम भालेराव, गणेश परिहार, सचिन लोखंडे, सचिन इंगळे, गोपाल परिहार, सुरेश परिहार, संदीप निकाळजे, शंकर लोखंडे, शंकर चव्हाण, चेतन देशमुख, आलम खान, आसिफ खान, जगन्नाथ लोखंडे , शिवदास कोलते, सोमनाथ तायडे, विष्णू पवार, विशाल कारले, समाधान मोरे, अमोल मोरे, अक्षय डोईफोडे यांच्यासह माळशेंबा, खोर, अंत्रीकोळी, वाघापूर ,भोगावती, तांदुळवाडी, पिंपळगाव सराई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यसनमुक्ती काळाची गरज!
साकेगावचा युवकवर्ग मेहनती आहे, धडपड्या आहे. अनेकजण व्यवसायात गुंतले आहेत. यामाध्यमातून गावात पैसा येतोय. मात्र हा पैसा गावात राहिला पाहिजे. युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. व्यसनमुक्तीचा संकल्प करावा. व्यसनमुक्ती काळाची गरज आहे. ‘वन बुलढाणा मिशन’च्यावतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पायदळ वारी काढण्यात आली होती. यामध्ये आध्यात्म आणि विकासाचा गजर करण्यात आला. पाचशेवर युवकांनी या वारीत सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संकल्प केला.