बिबी (ऋषी दंदाले) – यावर्षी पाऊस लांबल्यामुळे जुलैमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली होती. मात्र सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली. परंतु सोयाबीनवर येलो मोजेक या विषाणू रोगामुळे शेतकर्यांच्या पदरी काहीच पडत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर यापुढे जगायचे कसे, असा प्रश्न शेतकर्यापुढे उभा राहिला आहे.
बिबी मंडळात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात असून, हातात तोंडाशी आलेले पीक येलो मोजेक रोगाच्या प्रादूर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी नेहमी संकटात सापडत आहे. नवनवीन रोग, व्हायरस, शेतकर्यांपुढे येत आहेत, कधी हुमनी अळी तर कधी बुरशीजन्य रोग, तर आता नवीनच येलो मोजेकने डोके वर काढल्यामुळे सोयाबीन पीक चांगले दिसत असताना येलो मोजेकच्या आक्रमणामुळे शेतकर्यांचे स्वप्न भंगलेले दिसून येत आहे.
उभे सोयाबीन पीक शेंगा भरण्यापूर्वीच पिवळे पडले. त्यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान होऊन एकरी तीन ते चार पोत्याचे उत्पन्न मिळत आहे. तसेच सोयाबीनला समाधानकारक भावही मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. लागवड, बियाणे, खते, पेरणी, मजुराचा खर्चही फिटत नसल्यामुळे शेतकरी शेतातून निघालेली सोयाबीनची काळजी घेऊन वाळवून चांगला भाव मिळेल, या आसेने मेहनत घेताना दिसत आहे. तरी कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन शासनाकडून शेतकर्यांना तात्काळ मदत मिळून देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.