– शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने केली शिष्टाई; पालक व ग्रामस्थांच्या अनेक मागण्या मान्य, शाळा पूर्ववत सुरू!
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे श्री.शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षकांच्या बदलीमुळे तापलेले वातावरण अखेर शांत झाले असून, शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच्यावतीने पाठवण्यात आलेल्या लाईफ मेंबर समितीने पालक व ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन, ग्रामस्थ व पालकांना विनंती केली असता त्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थ व पालकांनी शाळेला ठोकलेल्या कुलपाची चावी देऊन अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्याहस्ते शाळेचे गेट उघडण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अख्ख्या गावाने कडकडीत बंद पाळल्याचे निदर्शनास आले आहे.
याप्रसंगी ग्रामस्थ, पालक, शिक्षक, प्राचार्य, पत्रकार मंडळी यांच्या समक्ष शाळेमध्ये एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये ग्रामस्थांच्यावतीने परशुअण्णा पडघान यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराची आपबीती कथन केली. त्यांच्यानंतर सुनील पडघान, गुंजाळा गावचे माजी सरपंच दीपक केदार, मनुबाईचे नंदकिशोर वायाळ, मेरा बुद्रुकचे पोलीस पाटील बद्री प्रसाद पडघान, शिवसेना नेते राजेंद्र पडघान, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान, माजी पंचायत समिती सदस्य तसेच शाळा समिती सदस्य अमोल पडघान, चंदनपुरचे सुभाष इंगळे या सर्व मंडळींनी प्राचार्य शेख हे इतर सहकारी शिक्षक यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून, शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली आहे. मागील दीड वर्षापासून शाळेची पटसंख्या कमी झालेली असताना शाळेच्या संचालक मंडळामध्ये असलेल्या व्यक्तीच्या गावातूनच दुसर्या शाळेत अनेक दाखले गेल्याचे यावेळी सर्व मंडळींनी शिष्टाई करण्यासाठी आलेल्या समितीसमोर सांगितले. तसेच श्री. शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुक येथे नेमणूक झालेल्या शाळा समिती सदस्यांमध्येच गटतट असून त्या मंडळीचा कोणताच वचक शाळेवर राहिलेले दिसून येत नाही. चालू वर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे यावर्षीच्या बारावीचे परीक्षा केंद्र जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व तीन दिवसाच्या घटनेमध्ये पोलीस प्रशासन, पालक वर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी परेशान आहेत. यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येईल. शाळेतून बदली झालेले एस.बी. सोळंकी ह्या शिक्षकांचा शाळेच्या विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचा वचक असल्याने विद्यार्थी अभ्यासामध्ये सातत्य ठेवत असे, त्यामुळे बदली झालेले सोळंकी सरांना परत ह्या शाळेवर बोलवावे व शाळेचे प्राचार्य शेख यांची तातडीने बदली करावी. या शाळेमध्ये शिक्षक कर्मचार्यांमध्येसुद्धा दोन गटात विभागणी झाल्यामुळे अनेक दिवसापासून असले प्रकार या शाळेमध्ये घडत आहेत. शिक्षकांमध्येच पडलेल्या गटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आजपर्यंत एकही पालक मेळावा या शाळेमध्ये घेण्यात आला नाही.
मेरा बुद्रुक या गावातील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये झालेला प्रकार हा निंदनीय असून, शाळा प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थ व पालकवर्ग आहेत. शाळेमध्ये झालेल्या प्रकारची समितीच्या मार्फत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल. ग्रामस्थ व पालकांनी आमचे म्हणणे ऐकून घेऊन शाळा चालू केल्याबद्दल सर्व मंडळीचे आभार व येणार्या काळामध्ये असे कोणतेही प्रकार या शाळांमध्ये घडणार नाही अशी आम्ही दक्षता घेऊ.
– अंधारे साहेब, शाळा निरीक्षक
शाळेची शिक्षक पालक समिती हीसुद्धा कागदावरच असून यामुळे पालक शिक्षक विद्यार्थी यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनेक दिवसापासून ताळमेळ राहिलेला नाही. पर्यायाने या शाळेमध्ये गरीब बहुजन लोकांचे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे. मेरा बुद्रुक मध्ये एकच श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची एकच शाळा असल्याने पर्यायी दुसरी संस्था नसल्याने मेरा बुद्रुक सह मनुबाई, गुंजाळा, चंदनपुर येथील विद्यार्थ्यांना एकमेव पर्यायी शाळा आहे. आजपर्यंतचा इतिहास या शाळेचा बघितला असता या शाळेने नामवंत वकील,नामवंत डॉक्टर,प्राचार्य, प्राध्यापक, देशपातळीवर कामगिरी करणारे विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे या शाळेचा दर्जा खूप उंचावलेला होता. परंतु सध्या शाळेचा या दिसाळ नियोजनामुळे व ढासळलेल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी बाहेरच्या गावी शिक्षणाला जात आहेत. अशा अनेक गोष्टी लाईफ मेंबर समितीच्या समोर ग्रामस्थांनी कथन केल्या यावर शाळेचे प्राचार्य शेख हे कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्यावर उपस्थित समितीमधील लाईफ मेंबर व्ही.डी.देशमुख,नाना राऊत भालचंद्र पवार,सुभाष पाटील,शाळा निरीक्षक अंधारे साहेब,शाळा समिती सदस्य एकनाथराव थुट्टे या सर्व मंडळींनी शाळेतील प्राचार्यासह सर्व शिक्षक वृंदांना खडे बोल ग्रामस्थ व पालकासमोरच सुनावले. त्यामध्ये त्यांनी झालेल्या प्रकाराचे खंडन करून आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व शिक्षक मंडळींनी प्राचार्यांनी कामांमध्ये सातत्य ठेवावे वार्षिक नियोजनाचे पुस्तक तयार करावे, शिक्षकांच्या गरजा विद्यार्थ्यांच्या गरजा पालक सभा सूचना या पुढे नियमित घ्याव्या शाळेचे आचारसंहिता उच्च प्रकारची ठेऊन शाळेचा दर्जा शैक्षणिक गुणवत्ता राजकीय विरहित ठेवून शिक्षणाचे शैक्षणिक कार्य करावे, पक्ष गटतट शाळेच्या गेटच्या बाहेर ठेवून शाळेमध्ये आल्यानंतर आदर्श शिक्षक अशी ओळख ठेवून शैक्षणिक कार्य करण्याच्या सूचना त्यांनी प्राचार्य व शिक्षकांना केल्या. तीन दिवस घडलेला शाळा बंदचा प्रकार सर्वांनी भावनेला आवर घालून आमच्या शब्दाला मान देऊन शाळा सुरू केल्याने त्यांनी ग्रामस्थ पालक यांचे आभार मानले.
या नाट्यमय घडामोडींमध्ये अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार एक दिवसाअगोदर पासून गावांमध्ये तळ ठोकून व पुकारलेल्या बंदच्या दिवशी आपल्या सोबत पोलीस कर्मचार्यांना घेऊन अत्यंत शांततेत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली. त्यामुळे बंद मध्ये व शाळा सुरू करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. आजच्या संपूर्ण घडामोडीमध्ये गावातील पालक ग्रामस्थ दिवसभर शाळेमध्ये होते त्यामध्ये शिवसेनेचे राजू पाटील,विनायकराव पाटील,पोलीस पाटील बद्रीप्रसाद पडघान,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील,शाळा समिती सदस्य अमोल पडघान,सुनिल पडघान,दीपक केदार रमेश टेटवार,परशुअण्णा पडघान,सागर पडघान सह प्रकार मंडळी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.