– देऊळगाव साकरशाच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी केले ‘राळेगणसिद्धी पॅटर्न’चे अवलोकन!
राळेगणसिध्दी/बुलढाणा (बाळू वानखेडे) – कोणतीही आस न ठेवता माझे संपूर्ण आयुष्य मी देश आणि समाजाला समर्पित केलेले आहे. गेल्या ५० वर्षात घराचे तोंडदेखील पाहिले नाही, असे थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना सांगितले. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक बाळू वानखेडे यांनी नुकतीच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांच्यासह राज्यातील आदर्शगाव राळेगणसिध्दी येथे भेट दिली. यावेळी अण्णा हजारे यांच्यासोबत झालेल्या भेटीत या चर्चेची मैफिल रंगली.
प्रथम बारा वर्षे आर्मीमध्ये राष्ट्रसेवेचे काम केल्यानंतर गेल्या ५० वर्षापासून समाजसेवेचे अविरत काम आज वयाच्या ८७ व्यावर्षीही सुरूच आहे, असे सांगून अण्णा हजारे हे बोलते झाले. बुलढाणा जिल्ह्यातही आपल्या सभा गाजल्या, त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला होता, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. वय वाढले असले तरी त्यांचे बोलणे व देहबोलीतून वेगळाच जोष दिसून आला. यावेळी त्यांनी केलेली विविध आंदोलने तसेच आदर्श गाव राळेगणसिध्दी येथील विविध उपक्रम व कामाबाबत सविस्तरपणे माहिती दिली. राळेगणसिध्दीवासीयांच्या सहकार्यानेच आपण हे करू शकलो, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी मीडिया सेंटर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, हिंद स्वराज्य ट्रस्ट, यादवगीर बाबा हायस्कूल यासह विविध ठिकाणी भेटी देवून माहिती जाणून घेतली. राळेगणसिध्दी येथील माळरानासह बाराशे एकर जमीन अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून बारमाही पाण्याखाली आल्याचे सांगण्यात आले.
गावात फेरी मारली असता बसथांबा आढळून आला नाही. तर गावातील तिनशे युवक सैन्यात असून, गुटखा, विड़ी, तंबाखू, सुपारीची आम्हाला ओळखही नसल्याचे गावकर्यांनी सांगितले. तगड़ा बंदोबस्त असतानाही अण्णा हजारे सहज उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी देऊळगाव साकरशाचे सरपंच संदीप अल्हाट, सदस्य रणजीत देशमुख, रमेश पवार, जेष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक बाळू वानखेड़े, रामचंद्र चव्हाण, समाजसेवक बबन चव्हाण, भिकाजी गायकवाड़, गणेश अल्हाट, उमेश सह आदी उपस्थित होते.