– सकल ब्राम्हण समाजाकडून आर्थिक महामंडळासाठी आझाद मैदानावर उपोषणाची हाक
– ‘अमृत’च्या योजनेबद्दल ब्राम्हण समाज नाखुश?
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – ब्राम्हण समाजाच्या विद्यार्थी, तरूण, उद्योजक यांच्यासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते तथा आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी कालच मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले आहे. दरम्यान, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळासाठी सकल ब्राम्हण समाजाच्यावतीने आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाची हाकदेखील देण्यात आली आहे. ब्राम्हण समाजासह खुल्या प्रवर्गातील उच्चजातीकरिता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘अमृत’ ही स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे. परंतु, ही संस्था निव्वळ पांढरा हत्ती ठरली असून, तिचा गेल्या चार वर्षात फारसा कुणाला लाभ झालेला नाही, अशी दुर्देवी स्थिती आहे. त्यामुळे ‘अमृत’ नको तर स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळच हवे, अशी मागणी ब्राम्हण समाजातून पुढे आलेली आहे.
सकल ब्राम्हण समाजाच्यावतीने भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पदूदेवा जोशी व अनंत जोशी हे १६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात ब्राम्हण समाज उपस्थित राहणार आहे. दरम्यान, ब्राम्हण समाजातून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाच्या विद्यार्थी, तरूण, उद्योजक यांच्यासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खामगावचे आमदार तथा भाजप नेते अॅड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्वतंत्र आर्थिक विकास मंडळाचा मुद्दा नजीकच्या काळात चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
—————–