Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला!

– भाजपविरुद्ध इंडिया आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.

Imageपत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाने सर्व पाच राज्यांचा दौरा केला. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली. मिझारोमचा कार्यकाळ २०२३ रोजी संपतोय तर इतर ४ राज्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. या ५ राज्यात ६७९ विधानसभा जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष मतदार तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. या राज्यांमध्ये ६० लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजपची आतापर्यंतची रणनीती पाहता, प्रचाराची मुख्य धुरा आणि केंद्रबिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच असेल, असे दिसत आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीत मोदींच्या या लोकप्रियतेचा भाजपला हवा तसा फायदा झाला नव्हता. त्यामुळे या पाचही राज्यांच्या निवडणुकीत मोदी फॅक्टर अजूनही कितपत प्रभावी आहे, याची चाचपणी होईल. जातीनिहाय जनगणना, शेतकर्‍यांचे प्रश्न, महागाई आणि अँटी-इन्कम्बन्सी हे घटकही पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. सलग तिसर्‍यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मनसुबा असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे.


सध्याच्या घडीला मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांपैकी १२८ जागा भाजपकडे आणि ९८ जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. राजस्थानमध्ये एकूण २०० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे १०८, भाजपचे ७०, आरएलडीचा एक, आरएलएसपीचे तीन, बीटीपी आणि डाव्यापक्षाचे प्रत्येकी दोन आणि १३ अपक्ष आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये ९० जागा असून त्यात काँग्रेसचे ७१, भाजपचे १५, बसपाचे दोन आणि जेजेएसचा एक आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!