Breaking newsBuldanaHead linesMaharashtraVidharbha

विजयराज शिंदे यांचा अपघात, की घातपाताचा प्रयत्न?

– लोकसभेसाठी भाजपचा चेहरा म्हणून नेतृत्वाच्या नजरा; त्यामुळे संशयाचे ढग आणखी गडद!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे जिल्हा निवडणूक प्रमुख तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आ. विजयराज शिंदे यांच्या कालच्या दुर्देवी अपघातानंतर या अपघाताबद्दल आता जिल्हावासीयांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आहे. हा खरोखर अपघात होता, की घातपाताचा प्रयत्न होता? याबाबत जनमाणसांत चर्चा सुरू आहे. भाजपचे नेतृत्व शिंदे यांच्याबाबत लोकसभा निवडणुकीसाठी आगामी चेहरा म्हणून पाहात आहे. त्यासाठीच त्यांच्या खांद्यावर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदाची धुरा सोपावली गेलेली आहे. अशा राजकीय परिस्थितीत हा अपघात झाल्याने, आणि क्षतीग्रस्त वाहनाची स्थिती व अपघाताची तीव्रता पाहाता, संशयाचे ढग गडद होत आहेत. अलिकडे देशात अशाच प्रकारच्या रस्ते अपघातात अनेक चांगले नेते गेले आहेत. त्यामुळे या अपघाताबाबतही शंकाकुशंका निर्माण होत आहेत.
विजयराज शिंदे यांच्या गाडीचा शनिवारी अकोला-मूर्तिजापूर महामार्गावरील कुरणखेड येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात एअरबॅग उघडल्याने शिंदे थोडक्यात बचावले. तरीही त्यांना बराच मार लागला, त्यामुळे त्यांना अकोला येथील खासगी रूग्णालयात दाखल करावे लागले होते. एका बसने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. शिंदे यांची अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली व ते पुढे अमरावतीला निघाले होते. तेव्हा हा प्रकार घडला. मात्र, सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळीच उघडल्याने शिंदे बचावले. ज्या बसने धडक दिली, त्या बसचा चालक वाहन चालवताना मोबाईल पाहात होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे या चालकाची खरे तर कसून चौकशी व्हायला हवी.


बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणुकीचा आगामी चेहरा म्हणून शिंदे यांच्याकडे पक्षस्तरावर पाहिले जात आहे. भाजपचे बुलढाणा जिल्हा प्रभारी तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जिल्ह्याची धुरा आहे. आगामी निवडणुकीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि, हे दोन्ही नेते बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या वाहनाचा झालेला इतका भीषण अपघात पाहाता, हा खरेच अपघात होता, की घातपाताचा प्रयत्न होता? याबाबत शंकेची पाल चुकचुकत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री विनायक मेटे, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचाही अशाच अपघातात दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून शिंदे थोडक्यात बचावले असले तरी त्यांनी यापुढे अधिक सावध राहण्याची गरज आहे.


कोण आहे विजयराज शिंदे?

बुलढाण्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून विजयराज शिंदे यांची ओळख होती. तालुका प्रमुख ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. सुरुवातीला नगरसेवक या पदापासून सुरुवात करत त्यांनी १९९५ रोजी पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर २००४ आणि २००९ असा सलग दोनदा याच मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून शिवसेनेने संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिंदे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!