– सिंदखेडराजा येथे भव्य वाहन रॅली, मनोज जरांगे पाटलांचे भव्य स्वागत
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भेट देत तसेच राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत, मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आपली आरक्षणाची यात्रा काल मंगळवारी सुरू केली. यावेळी राजमाता मॉ जिजाऊ यांच्या राजवाड्यामध्ये जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जरांगे यांनी दर्शन घेतले. राजमाता सरकारला सुबुद्धी देवो वर्षानुवर्ष चाललेला अन्याय हा बंद झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी सिंदखेडराजा येथून सरकारला दिला. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला आहे. सरकारला आरक्षण द्यावचं लागेल, यावेळेस सरकार मराठा समाजाचा अंत पाहणार नाही. मराठा समाजाचं हे पहिलं आणि शेवटचा आंदोलनाचा धडा असणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा थेट इशारा दिला आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, राजमाता मॉ साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे. याच ठिकाणाहून जगाला स्वराज्य मिळाले, या ठिकाणावरून प्रेरणा मिळाली बळ मिळेल, असे ते म्हणाले. राजमाता माँ जिजाऊ यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आरक्षण हा कुणाचा विषय नाही आरक्षण ही मक्तेदारी नाही ही सुविधा आहे. जो समाज मागासलेला आहे. ज्या ज्या समाजाला व्यवसायाने आरक्षण दिले आहे. त्यामध्ये मराठा समाज आहे, सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे, पालकत्व तुमच्याकडे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सरकार कोणाचेही असो आंदोलनकर्ते या नात्याने विश्वास ठेवावाच लागतो, सरकारला आरक्षण द्यायचे नसते तर त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाच नसता. पाच हजार पानांचा अहवाल शासनाला दिला आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शासन कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याची आशा आम्हाला आहे. विदर्भाच्या नातलगांच्या भूमीत आलो आहे. ही पवित्र भूमी आमच्या पाठीशी आहे कारण आमच्या लेकराबाळांचे कल्याण व्हावे त्यांची सुद्धा इच्छा आहे. मातृतीर्थच्या भूमीने अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे. विदर्भातील आमचे बांधव आमच्या पाठीशी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे, असल्याचे यावेळी जरांगे पाटीलयांनी सांगितले.
सुरुवातीला शिवाजीनगर येथील टी पॉइंट ते लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यापर्यंत भव्य वाहन रॅली याप्रसंगी काढण्यात आली. यामध्ये शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. राजवाड्यामध्ये प्रवेश करतात महिलांनी औक्षण करून फटाक्याच्या आतषबाजीने जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी महामुने, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवी, ठाणेदार दत्तात्रय वाघमारे, ठाणेदार विकास पाटील, ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.