लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा; अद्याप ५० टक्के पेरण्या, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम!
– जिल्ह्यात खरीप पेरण्यासाठी चांगला पाऊस पडण्याची गरज
लातूर (गणेश मुंडे) – जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत पावसाने जेमतेम हजेरी लावली असली तरी, उदगीर तालुक्यात मात्र पावसाची संततधार सुरु आहे. मानमुडी नदीला चांगले पाणी आले असून, बनशेळकी तलाव भरताना दिसत आहे. जिल्ह्यात दिडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असून, पेरण्यामात्र ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत. कालपासून ढगाळ वातावरण असले तरी, अद्याप पाहिजे तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. नदी, नाल्यांना चांगले पाणी येईपर्यंत जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील टँकर बंद करू नयेत, अशी मागणी पुढे आली आहे.
उदगीर शहरासह तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसून, पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, नद्या, नाले भरुन वाहत आहेत. उदगीर तालुक्यातील मानमुडी नदी वाहू लागली असून, बनशेळकी तलावात पाणी साठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मात्र फारसे दिलासादायक चित्र नाही. जून महिन्यांत पडलेल्या अल्पशा पावसावर शेतकर्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली होती. तर काही शेतकर्यांनी जुलैमध्ये पेरणी केली असल्याने गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे या पिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात चांगला पाऊस नसताना, जुलै महिना उजाडताच जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाईच्या कृती आराखड्याची मुदत संपली आहे. सध्या ना पाऊस, ना पाणी अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात १४ गावे, ५ वाड्यांवर २० अधिग्रहणाद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यात जवळपास दिडशे मिलीमीटर पाऊस झाला आहे. या अल्प पावसामुळे पेरण्याही ५० टक्याच्यापर्यंत झाल्या आहेत. उर्वरीत ५० पेरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. जर जमिनीत पावसाचे पाणीच मुरणार नसल विहिर, बोअरला कोठून येणार अशी परिस्थिती आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीसाठी पोषक असलेला पाऊस झाला नव्हता. काल सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.