– गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरु, नाशिक, नगर जिल्ह्यांत पूरस्थिती
– सप्तशृंगी गडावर ढगफुटी, खान्देशात चोहीकडे जोरदार पाऊस
नाशिक (ब्रेकिंग महाराष्ट्र ब्युरो) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर, दहिवेल, पश्चिम आदिवासी भागात तसेच तालुक्यात सर्वदूर गेल्या दोन दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने, तालुक्यातील पांजरा, कान, जामखेली आदी नद्यांना पूर आला आहे. दहिवेल व साक्री शहरातून वाहणार्या कान नदी महापुराने दुथडी भरून वाहात आहे. अजूनही पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने महापूराची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पातळीवर साक्री तालुका प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी २ वाजेपासून धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नदी काठ नाशिक व नगर जिल्ह्यांतील गावांना सतर्क करण्यात आले आहे.
आज सकाळी साधारण नऊ वाजेनंतर साक्री शहरापर्यंत कान नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. पिंपळनेर रोडवरील पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी पोहोचल्यामुळे नदीकाठावरील गोसावी वस्तीच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. साक्री शहरातून भाडणे गावाकडे जाणार्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही गावातला संपर्क तुटला होता. पोलीस प्रशासनाने दोन्ही फुलांवर योग्य तो बंदोबस्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले. साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे व त्यांचे सर्व पोलीस अधिकारी, सहकारी तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाचे जवान नदी काठावरील धोक्याच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी सक्रिय होते. या पातळीवर डोक्याची परिस्थिती पाहता, नागरिकांनी सतर्क राहावे व काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाला सूचित करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी केले आहे. सकाळी आलेल्या पुरामुळे दहिवेल येथील कान नदी पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली व अत्यावश्यक वाहतूक साखरी मार्गे वळवण्यात आली. अष्टाने छडवेल गावातील फुलांवरून पाणी वाहत होते.
काटवान परिसरातील सामोडे धाडणे कासारे येथील पांजरा नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. दातर्ती गावातील पांजरा नदीवरील पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. पश्चिम भागात अद्याप पाऊस सुरूच असल्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साक्रीत कान नदीला आलेल्या पुरामुळे परिसरात जीवित, वित्तहानी होऊ नये म्हणून साक्री नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनीही योग्य तो बंदोबस्त ठेवला असून, नदी काठावरील संभाव्य धोक्याचे ठिकाणी नगरपंचायत कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात संततधार, सप्तशृंगी गडावर ढगफुटी
यासह, मालेगाव, मनमाड, सटाणा यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. सलग जोरदार पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून पुराचे पाणी पूल आणि रस्त्यावरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. सप्तश्रृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मंदिराच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणार्या पाण्यामुळे पायर्यांना धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
————